व्हिडिओकॉन कंपनीच्या भंगाराला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 01:08 AM2018-06-05T01:08:32+5:302018-06-05T01:08:43+5:30
पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील व्हिडिओकॉन उद्योग समूहाच्या रेफ्रिजरेटर विभागाच्या भंगार सामानाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चितेगाव : पैठण रस्त्यावरील चितेगाव येथील व्हिडिओकॉन उद्योग समूहाच्या रेफ्रिजरेटर विभागाच्या भंगार सामानाला सोमवारी दुपारी अचानक आग लागली. अवघ्या काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीवर नियंत्रण आणण्यात अग्निशमन जवानांना चार ते पाच तास लागले. या आगीत किती नुकसान झाले याची माहिती कंपनी व्यवस्थापनाकडून रात्री उशिरापर्यंत घेणे सुरू होते, यामुळे नुकसानीचा आकडा समजू शकला नाही.
व्हिडिओकॉन कंपनीच्या आवारातील सुमारे दहा एकर जागेवर भंगार सामान ठेवण्यात आलेले आहे. या भंगाराला सोमवारी दुपारी २.१५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यामध्ये कंपनीचे रेफ्रिजरेटर मटेरियल, पॅकेजिंग साहित्य, पंप, पुठ्ठा, थर्माकोल, प्लास्टिक अधिक प्रमाणात होते. ही आग नजरेस पडताच कंपनीच्या तीन बंबांनी आग विझविण्यास सुरुवात केली. त्यानंतर मनपा अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मनपा अग्निशमन दलासह, एमआयडीसी आणि बजाज कंपनीचे बंब, खाजगी १२ टँकर आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल झाले. तीन ते चार तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश आले.
पाच कि.मी.पर्र्यंत धूरच धूर
आगीच्या भक्ष्यस्थानी रेफ्रिजरेटरचा पंप, थर्माकोल, पुठ्ठा आणि प्लास्टिक मटेरियल आदी ज्वलनशील साहित्य असल्याने आग अधिक भडक ली. थर्माकोलमुळे धुराचे काळे लोट पाच किलोमीटरपर्यंत पसरले. धुराचे लोट दुरून नजरेस पडत असल्याने नागरिक धूर पाहून कंपनीसमोर त्यांची वाहने थांबवित आणि पुढे जात. बिडकीन पोलिसांनी कंपनीत जाऊन आगीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कंपनी कामगारांनीही आग विझविण्यासाठी धावपळ केली. सर्वत्र स्क्रॅप पसरलेले असल्यामुळे आग विझविण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने रस्ता तयार करून अग्निशामक बंब शेवटच्या टोकापर्यंत नेण्यात आले. या घटनेतील नुकसानीचा पंचनामा केला जाईल, असे राजेंद्र बंग यांनी सांगितले.