जि. प. अध्यक्षांच्या अँटीचेंबरला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 01:25 AM2017-11-03T01:25:37+5:302017-11-03T01:25:40+5:30
जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या दालनात अँटीचेंबरमध्ये सकाळी १0.१५ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्हा परिषद अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर यांच्या दालनात अँटीचेंबरमध्ये सकाळी १0.१५ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामध्ये अँटीचेंबरमधील फॅन, वायरिंग व काही फर्निचरचे नुकसान झाले.
गुरुवारी सकाळी कार्यालयात अधिकारी- कर्मचाºयांची लगबग सुरू झाली. तेव्हा अध्यक्षांच्या दालनात अँटीचेंबरच्या मागील खिडकीतून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे काही कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. यापैकी आरोग्य विभागाचे वाहनचालक रगडे यांनी धावत जाऊन ही बाब अध्यक्षांचे स्वीय सहायक हिरेकर व शिपाई गणेश नेवलेकर यांना सांगितली. या दोघांनी आग विझविण्यासाठी अँटीचेंबरकडे धाव घेतली; पण ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ ही घटना जि. प. च्या इलेक्ट्रिकल शाखेला कळविली. तेव्हा इलेक्ट्रिकल अभियंता के. व्ही. केले व वीजतंत्री कल्याण ढोरकुले यांनी अध्यक्षांच्या दालनाकडे धाव घेतली. त्यांनी दालनाचा सुरू असलेला विद्युत पुरवठा खंडित केला. तोपर्यंत भिंतीला टांगण्यात आलेला पंखा जळून तो टेबलवर पडला होता. त्यामुळे टेबलवरची काच फुटली होती. भिंतीवरील वायरिंग जळून खाक झाल्या होत्या. संपूर्ण भिंत काळवंडली होती. अँटीचेंबरमध्ये दाटलेल्या धुरामुळे या कर्मचाºयांना श्वास घेणेही अवघड झाले होते.