फटाका मार्केट अयोध्या मैदान आणि वाळूजमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 12:39 AM2017-10-14T00:39:59+5:302017-10-14T00:39:59+5:30
सुरक्षेच्या कारणास्तव शहरात केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदान आणि वाळूज परिसरातच फटाका मार्केटला शुक्रवारी परवानगी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सुरक्षेच्या कारणास्तव शहरात केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदान आणि वाळूज परिसरातच फटाका मार्केटला शुक्रवारी परवानगी देण्यात आली. सिडको-हडको, मुकुंदवाडी आणि शिवाजीनगर येथील दुकानांच्या परवानगीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी पत्रकारांना सांगितले.
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस आयुक्त यशस्वी यादव म्हणाले की, शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी फटाका मार्केटच्या परवानगीसाठी अर्ज प्राप्त झालेले आहेत. गतवर्षी औरंगपुरा येथील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका मार्केट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोर पालन करणाºया असोसिएशनला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि उपायुक्त डॉ. विनायक ढाकणे यांना फटाका मार्केटसंबंधी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या दोन्ही अधिका-यांचे अहवाल पोलीस आयुक्तांना शुक्रवारी दुपारपर्यंत प्राप्त झाले नव्हते. पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, रहिवासी एरियात फटाक ा दुकानांना परवानगी देण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. सध्यातरी पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत केवळ कर्णपुरा येथील अयोध्या मैदानावर आणि वाळूज एमआयडीसी परिसरातच फटाका मार्केटला परवानगी देण्यात आली आहे. शहरातील दहा ठिकाणी दरवर्षी फटाका मार्केट सुरू होते. या दुकानांमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होत असते. दिवाळीला अवघे पाच दिवस उरले असताना फटाका मार्केटसंदर्भात निर्णय न झाल्याने व्यापारी हवालदिल झाले आहे. परवानगी न मिळाल्यास व्यापा-यांनी आंदोलनाची तयारी केली आहे.