धूरात सुरक्षा किट नसल्यानेच अग्निशमन जवान कुटुंबापर्यंत पोहोचू शकले नाही
By सुमित डोळे | Published: April 5, 2024 02:10 PM2024-04-05T14:10:24+5:302024-04-05T14:10:45+5:30
धुरात जाण्यासाठी हूड, फेसमास्क का नाहीत?, स्थानिकांना बॅटऱ्या धरून उजेड द्यावा लागला
छत्रपती संभाजीनगर : छावणीतील आगीच्या घटनेने बुधवारी संपूर्ण शहर हळहळले. ऐन रमजानच्या महिन्यात कष्ट करून सुखाने जगणाऱ्या सात जीवलगांचा मृत्यू झाला. मात्र, आपत्कालीन व्यवस्थापनाची जबाबदारी असणाऱ्या अग्निशमन विभागाच्या गंभीर उणिवा या घटनेमुळे समोर आल्या. अग्निशमन जवान केवळ डोक्यात हेल्मेट आणि टीशर्ट परिधान करुन होते. त्यांच्या हातात ना ग्लोव्हज होते, ना धुरामध्ये घुसण्यासाठी हूड, फेसमास्क होते. परिणामी, दुसऱ्या मजल्यावरील शेख कुटुंबापर्यंत जवान वेळेत पोहोचू न शकल्याने मृत्यूंची संख्या वाढत गेल्याचा आरोप आता होत आहे.
३.४१ वाजता पदमपुरा अग्निशमन केंद्राला घटनेचा कॉल प्राप्त झाला. त्यानंतर तिसऱ्या मिनिटाला अग्निशमन अधिकारी व जवान रवाना झाले. रस्त्यामध्ये एका ठिकाणी एका कार्यक्रमाचा मंडप थाटलेला असल्याने त्यात पथकाचा वेळ गेला. ३.५० च्या आसपास पहिला बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र, तोही अपुऱ्या सोयीसुविधा अभावीच दाखल झाला.
या प्रश्नांची उत्तरे मनपा देईल का ?
-प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, वीजपुरवठा बंद झाल्याने अंधारात आग आटोक्यात आणण्यासाठी अपेक्षित व्यवस्थाच अग्निशमन विभागाकडे नव्हती. स्थानिकांना हातात बॅटऱ्या धरून त्यांना मार्ग दाखवावा लागला.
-फायरफायटर पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट जवानांकडे नव्हती. काही जवान साधी निळी पॅण्ट, पांढरा टी शर्टवर होते.
-जवानांच्या हातात साधे ग्लोव्हज देखील नव्हते. शिवाय, धुरात प्रवेश करण्यासाठी एकाच्याही तोंडाला हूड व फेसमास्क दिसले नाही. परिणामी, ते आत प्रवेशच करु शकले नाही.
-गरम शटर कापण्यासाठी विभागाकडे आवश्यक साहित्य नव्हते. जेसीबी येईपर्यंत बराच वेळ गेला.
कुटुंबाची तक्रार
दरम्यान, शेख यांची मुलगी उजमा व नगमा यांनी पोलिस उपायुक्त नितिन बगाटे यांच्याकडे अर्ज करत अस्लम याच्यावर गंभीर कारवाईसह अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना निष्काळजीपणाला कारणीभूत धरत सहआरोपी करण्याची मागणी केली. छावणी पोलिसांनी आमची तक्रार स्वीकारली नाही. दोन दिवसांनी आम्ही तक्रार घेत नसतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितल्याचा आरोपही मुलींनी केला.
साधे ताब्यातही नाही
घटनेनंतर अस्लम कुटुंबासह पसार झाला. गुरुवारी घराला कुलूप होते. मात्र, सात जणांच्या मृत्यूला जबाबदार अस्लम याला छावणी पाेलिसांनी चोवीस तास उलटूनही साधे ताब्यातही घेतले नव्हते.
पोलिस अटकेचा निर्णय घेऊ शकतात
घरमालकाने सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष केले. बाहेर पडण्यास अपुरी जागा, अरुंद जिना, मर्यादेपलीकडे बांधकाम, घरगुती मीटरवर व्यवसायामुळे ही भीषण घटना घडली. १३ जून १९९७ रोजी नवी दिल्लीत उपहार सिनेमा हॉलमध्ये दोषपूर्ण ट्रान्सफॉर्मरमधून आग लागून जीव गेले होते. त्यात हॉटेलमालकाला तत्काळ अटक करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने उपहार सिनेमा हॉलच्या बन्सल ब्रदर्सला सात वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे अटक करताच येत नाही, असे नाही. घटना गंभीर आहे. त्यामुळे पोलिस अटकेचा निर्णय निश्चित घेऊ शकतात.
- ॲड. प्रशांत नागरगोजे, कायदे अभ्यासक.