रेल्वेस्थानकातील उपहार गृहाच्या चिमणीला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 20:28 IST2018-06-20T20:27:58+5:302018-06-20T20:28:57+5:30
रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली.

रेल्वेस्थानकातील उपहार गृहाच्या चिमणीला आग
औरंगाबाद : रेल्वेस्थानकातील उपाहारगृहामधील धूर सोडणाऱ्या चिमणीला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. आज पहाटे सहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून पंधरा मिनिटांत आग विझवली.
रेल्वे स्थानकामध्ये उपाहार गृहात खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी स्टोव्हचा वापर केला जातो. याच्या धुराचा त्रास होऊ नये यासाठी चिमणीद्वारे तो बाहेर सोडला जातो. अनेक महिन्यांपासून चिमणी स्वच्छ झालेली नसल्याने खाद्यपदार्थ तळले जात असताना हवेत तेलाचे कण उडून ते चिमणीच्या डकमध्ये साचले जातात. आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास या उपहार गृहात पुरी तळण्यात येत असताना अचानक स्टोव्हचा भडका उडाला. यामुळे चिमणीच्या आतील भागात साचलेल्या तेलाच्या थराने पेट घेतला.
यामुळे आगीचे लोळ बाहेर आले. घटनेची तीव्रता लक्षात घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने पंधरा मिनिटांत आग विझवली. सुदैवाने यात जिवीत हानी झाली नसल्याचे स्टेशन मास्तर लक्ष्मीकांत जखडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.