Video: ‘जय श्रीराम’च्या जयघोषात पं. धीरेंद्र शास्त्री यांचे छत्रपती संभाजीनगरात जंगी स्वागत
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 6, 2023 12:56 PM2023-11-06T12:56:15+5:302023-11-06T12:57:57+5:30
बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला.
छत्रपती संभाजीनगर : चिकलठाणा विमानतळाबाहेर दीड तासापेक्षा अधिक वेळ उभे राहिलेल्या भाविकांना रात्री ८:४४ वाजता पांढऱ्या कारमध्ये डाव्या बाजूस बसलेले गोरेगोमटे हसतमुख चेहऱ्याचे पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज दिसले आणि त्यांनी कारमधून बसूनच हात वर करीत सर्वांना नमस्कार केला. तेव्हा ‘जय श्रीराम’, बागेश्वर धाम की जय’ असा उत्स्फूर्तपणे जयघोष निनादला.
‘साधू संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा’ याची प्रचिती रविवारी रात्री बघण्यास मिळाली. बागेश्वरधाम सरकार पं. धीरेंद्र शास्त्री यांचे आगमन शहरात झाले आणि सर्वत्र ‘बागेश्वर धाम की जय’चा जयघोष सुरू झाला. शंखनाद, ढोलताशाचा नाद आणि आतषबाजी सुरू असताना विमानतळाबाहेर कारमधून महाराज बाहेर आले, तेव्हा भाविकांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. वाहन रॅलीला सुरुवात झाली तेव्हा सारे हा क्षण आपल्या मोबाइलमध्ये टिपून घेत होते. कारच्या आजूबाजूला १० पेक्षा अधिक बॉडीगार्ड होते; पण भाविकांनी कारला चोहोबाजूंनी वेढा घातला. लोकांना हटविताना या बॉडीगार्ड्सना घाम फुटला होता. पोलिस बंदोबस्त होता, पण त्यांनाही गर्दी आवरली जात नव्हती. काही भाविक या कारच्या मागे धावत होते. संजयनगरात डीजे लावण्यात आला होता. मुकुंदवाडीत गुलाबांची उधळण करीत भाविकांनी जोरदार स्वागत केले. असेच स्वागत वसंतराव नाईक चौकात झाले. येथे तर जेसीबीवरून पृष्पवृष्टी करण्यात येत होती. यामुळे महाराजांची पांढरी कार गुलाब पाकळ्यांनी भरली होती. गाड्यांचा ताफा केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्या एन ३ येथील निवासस्थानी पोहोचला. तरीही तासभर हजारो भाविक महाराजांची एक झलक पाहण्यासाठी तिथे थांबून होते.
६ कि.मी.च्या अंतरासाठी लागली ३४ मिनिटे
चिकलठाणा विमानतळ ते सिडको एन-३ पर्यंत ६ कि.मी. अंतर पार करण्यासाठी पं. धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या ताफ्याला ३४ मिनिटे लागली. एन-३ मध्ये शोभायात्रा पोहोचली तेव्हा वाहन रॅलीतील शेवटचे टोक रामनगर येथे होते.
६ वाजेपासून भाविक विमानतळाबाहेर उभे
पं. धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराजांचे सायंकाळी ७ वाजता आगमन होणार होते. यामुळे विमानतळाबाहेर रस्त्यावर शेकडो भाविक ६ वाजल्यापासून उभे होते. महाराजांची कार रात्री ८:४४ वाजता विमानतळाबाहेर आली. तेव्हा महाराजांची झलक पाहून सर्वांना आनंद झाला; पण खूप भाविक असे होते की, त्यांना महाराजांचे दर्शन झालेच नाही.
आज कलशयात्रा आणि हनुमान कथा
अयोध्यानगरीत सोमवारपासून पं.धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या श्रीराम व हनुमान कथेला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी १० वाजता क्रांती चौक येथून कलशयात्रा सुरू होणार आहे. पदमपुरा, रेल्वे स्टेशनमार्गे अयोध्यानगरीत कलशयात्रेची सांगता होईल. त्यानंतर, दुपारी ३ ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान महाराज हनुमान कथा सांगणार आहेत.