बीडमध्ये हवेत गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 12:51 AM2017-09-19T00:51:09+5:302017-09-19T00:51:09+5:30
मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : लातूरला महाविद्यालयात असताना झालेला वाद सोमवारी उफाळून आला. मुलांचे दोन्ही गट समोरासमोर भिडले, हाणामारी झाली. त्यानंतर एकाने हवेत गोळीबार केला. ही घटना सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शहरातील अंकुशनगर भागात घडली. यामध्ये दोन्ही गटाच्या दोन-दोन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ऋतूपर्ण नागरे (थेरला), अनिकेत राख (पाटोदा), ऋषीकेश खंदारे (बीड), संदीप दहिफळे (बीड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ऋतूपर्ण नागरे व संदीप, ऋषीकेश हे तिघे लातूरला महाविद्यालयीन शिक्षण घेत होते. यावेळी त्यांचे अज्ञात कारणावरुन वाद झाले होते. दोघांच्याही मनात खुन्नस होती. सोमवारी दुपारी अंकुशनगर भागातील एका चौकामध्ये ऋतूपर्ण नागरे हा एका जीपमधून ६ मुलांना घेऊन बीडमध्ये आला. यावेळी ऋषीकेश व संदीप गटाने आणखी मुलांना बोलावून घेतले. ऋषीकेशच्या गटात जास्त मुले जमली. दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची झाली. त्यानंतर हाणामारीत रुपांतर झाले. याचवेळी ऋतूपूर्ण नागरे गटाच्या रुपसिंग टाक (टाक हे फौजी होते, अशी प्राथमिक माहिती आहे) यांनी हवेत गोळीबार केला. त्यामुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले. घटनास्थळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. संदीप व ऋषीकेशला तात्काळ ताब्यात घेतले तर ऋतूपर्ण व अनिकेतला पोलिसांनी चºहाटा, पिंपळवंडी, धुमाळवाडी या भागातील जंगलात पाठलाग करुन पकडले.
गोळीबार झाला त्याचवेळी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी मुन्ना वाघ हे तेथून जात होते. त्यांनी आवाज ऐकताच धाव घेतली.
त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता धूम ठोकली. यावेळी वाघ यांनी दोघांना ताब्यात घेतले. त्यानंतर सर्वांना माहिती दिली.
जवळच असलेले संघर्ष गोरे यांनीही धाव घेत एकाला ताब्यात घेतले. या दोघांच्या सतर्कतेमुळेच गोळीबार करणारे पोलिसांच्या हाती लागले.