किरकोळ वादातून जीम ट्रेनरवर गावठी कट्ट्यातून गोळीबार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:17 AM2019-04-11T00:17:50+5:302019-04-11T00:18:13+5:30
किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
औरंगाबाद : किरकोळ कारणावरून रात्री झालेल्या हाणामारीतून जीम ट्रेनरला मारहाण करण्यासाठी आलेल्या तीनपैकी एका जणाने गावठी पिस्टलमधून गोळी झाडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी शिवाजीनगर येथे घडला. झाडलेली गोळी थेट न जाता वर उडून पडल्याने सुदैवाने तरुणाचे प्राण वाचले. या घटनेनंतर आरोपी पळून गेले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
शेख अलीम शेख नवाब (२६, रा. गारखेडा) असे गोळीबारातून वाचलेल्या जीम ट्रेनरचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शेख अलीमचा नातेवाईक अनिस खान (२२,रा. देवळाई) हा मंगळवारी रात्री साडेअकरा ते पावणेबारा वाजेच्या सुमारास गारखेड्यातून देवळाईकडे मोटारसायकलने जात होता. शिवाजीनगर येथील एका वाईन शॉपजवळ त्याला ओळखीचा तरुण उभा दिसला. अनिस त्याच्याजवळ थांबला आणि तू एवढ्या रात्री येथे काय करतो, अशी विचारणा केली. यावेळी तेथे असलेल्या अन्य तीन तरुणांनी अचानक अनिसला शिवीगाळ करून भांडणास सुरुवात केली. ही बाब अनिसने अलीमला फोन करून कळविली. यामुळे अलीम हा अन्य दोन साथीदारांना घेऊन शिवाजीनगर येथे गेला आणि त्यांनी भांडण सोडविले. दरम्यान, बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे अलीम हा शिवाजीनगर येथील त्याच्या नयन फिटनेस सेंटर या व्यायामशाळेत गेला होता. रात्री मारहाण करणारे सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अचानक जीममध्ये आले आणि त्यांनी अलीमला जीमबाहेर बोलावले. तेथे त्यांच्यापैकी एकाने कमरेचे गावठी पिस्टल काढून अलीमच्या पोटाला लावले. तुला खतम करतो,असे म्हणून पिस्टलमधून गोळी झाडली. मात्र, पिस्टल लॉक झाल्याने गोळी थेट अलीमच्या पोटात न जाता ती पिस्टलमधून वर उडून खाली पडल्याने तो बालंबाल बचावला. या घटनेची माहिती अलीमने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळविली. पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
चौकट
आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
अलीम यांच्यावर गोळीबार केल्यानंतर एक जण पळून गेला. त्याच्यासोबत असलेल्या दोन जणांना समजूत काढण्यासाठी अलीम यांनी खेडकर हॉस्पिटलच्या आवारात नेले. तेथे मला तुमच्यासोबत भांडण करायचे नाही. रात्रीचा वाद मिटविण्यासाठी आलो होतो, असे अलीमला सांगत असताना दोन संशयित आरोपी हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेºयात कैद झाले. गोळीबार करणारा मात्र कॅमेºयात आला नाही. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला.
गोळीबार करणाºया त्रिकुटांपैकी दोन जणांना चार तासांत बेड्या
जीम ट्रेनरवर गोळ्या झाडल्याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिसांनी झटपट कारवाई करीत तीन आरोपींपैकी दोन जणांना अवघ्या चार ते पाच तासांत बायपासवरील बाळापूर फाटा शिवारात पकडले. आरोपींकडून गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतूसही पोलिसांनी जप्त केल्याची माहिती पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहादेव महादेव सोनवणे (वय २९), जितेंद्र वसंत राऊत (वय २२) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा तिसरा साथीदार सलीम हा पसार असून त्याचा शोध सुरू आहे. पोलीस आयुक्त म्हणाले, गोळीबाराबाबत माहिती मिळताच, पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनिरीक्षक विकास खटके, कर्मचारी मच्छिंद्र शेळके, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, विलास डोईफोडे, शिवाजी गायकवाड, रवी जाधव, राजेश यदमळ, जालिंदर मांटे यांनी आरोपींचा शोध सुरू केला. आरोपी बायपासवरील बाळापूर फाटा परिसरात लपून बसल्याची माहिती मिळाली. पथकाने लगेच तेथे जाऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या. आरोपींनी घरात लपूवन ठेवलेले पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
चौकट
शिर्डीमधून आणले होते पिस्तूल
आरोपी शहादेव हा वाहनचालक असून, त्याने सहा महिन्यांपूर्वी शिर्डी येथून एका जणाकडून हे पिस्तूल आणि जिवंत काडतूस विकत आणले होते. हे पिस्तूल विकत घेण्याचा त्याचा हेतू काय होता, हे मात्र समजू शकले नाही. शहादेवविरुद्ध हाणामारीचा यापूर्वी एक गुन्हा नोंद आहे.