मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 12:54 AM2017-12-20T00:54:28+5:302017-12-20T00:56:43+5:30
मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद शहरात सुरू होत आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब’ असे त्याचे नाव असून, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे यांच्या हस्ते एमजीएम परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील पहिले खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद शहरात सुरू होत आहे. ‘एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब’ असे त्याचे नाव असून, भारतीय विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या विज्ञान प्रसार केंद्राचे वैज्ञानिक डॉ. अरविंद रानडे यांच्या हस्ते एमजीएम परिसरात शुक्रवारी सकाळी १० वाजता या केंद्राचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
उद्योग, पर्यटन, कला, संस्कृती आणि आता शिक्षणाच्या क्षेत्रातही मोठे नाव कमावलेल्या औरंगाबाद शहराच्या वैभवात या केंद्राच्या निमित्ताने आणखी एक भर पडणार आहे. देशाचे राष्ट्रपती राहिलेले ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या नावाने सुरू होणाºया या विज्ञान केंद्रामध्ये सौर वेधशाळा, सायन्स पार्क, डिजिटल तारांगण, भारतीय अंतराळ तंत्रज्ञान दालन, होलोग्राफी थिएटर, ३-डी थिएटर, अंकगणित व भूमिती दालन आणि मूलभूत भौतिकशास्त्र विषयावरची दोन दालने आहेत.
औंधकर स्वत: खगोलशास्त्राचे अभ्यासक असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची उभारणी करण्यात आलेली आहे.
आदित्य सौर वेधशाळेमध्ये गॅलिलिओने केलेल्या संशोधनापासून ते आजपर्यंतचा इतिहास उलगडून दाखविण्यात येईल. सूर्याचे ‘रिअल टाईम’ अध्ययन व थेट निरीक्षण करण्याची सुविधा आणि दोन अत्याधुनिक टेलिस्कोप येथे आहेत. मराठवाड्यातील पहिले डिजिटल तारांगण केंद्राचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. यामध्ये ‘फिश आय फुलडोम’ तंत्रज्ञान वापरून विश्वनिर्मिती ते आधुनिक संशोधनवार आधारित माहितीपट दाखविले जातील. ते पाहून पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी केंद्रामध्ये इंग्रजी व मराठीतून माहिती सांगणारे प्रशिक्षित विज्ञान संवादक असतील.
लेझर होलाग्राफी प्रगत तंत्रज्ञानाद्वारे होलाग्राफीचे प्रत्यक्ष प्रयोग, त्रिमितीय तंत्रज्ञानाचे गुपित उलगडणारे माहितीपट दाखविले जातील. शालेय गणितातील प्रमेय व सिद्धांत समजावून सांगण्यासाठी खास ज्ञानरचनावादावर आधारित प्रयोगशाळा व भौतिकशास्त्रातील संकल्पना व नियम दैनंदिन जीवनातील उदाहरणांद्वारे स्पष्ट करणारे दालन या केंद्रामध्ये आहे. मुलांना हसतखेळत मनोरंजक पद्धतीने विज्ञानातील नियम समजण्यासाठी विशिष्ट प्रकारची विज्ञान खेळणी ठेवण्यात आली आहे. तसेच खगोल संशोधनातील टप्पे दाखविणारी पोस्टर्स, नकाशे, विविध ग्रह-ताºयांवरील आपले वजन मोजण्याची सुविधादेखील येथे आहे.
विज्ञानपे्रमींसाठी पर्वणी
सर्व अत्याधुनिक यंत्र व सुविधांनी सुसज्ज असे हे केंद्र मराठवाड्यातील विज्ञानपे्रमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. विद्यार्थी व सामान्य लोकांमध्ये विज्ञानाप्रती रुची वाढविण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. त्यासाठी विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शनपर कार्यक्रम आणि कोर्स आयोजित केले जातील.
-श्रीनिवास औंधकर, संचालक,
एपीजे अब्दुल कलाम खगोल
अंतराळ विज्ञान केंद्र व क्लब