आधी मुलाला कोंडले,नंतर बायकोवर वार केला; तिची तडफड पाहून स्वतःला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2021 12:40 PM2021-10-18T12:40:52+5:302021-10-18T12:46:08+5:30
Crime in Aurangabad : मुलाच्या खोलीला लावली बाहेरून कडी
औरंगाबाद/ दौलताबाद : क्षुल्लक वादातून कुऱ्हाडीचा तुंबा डोक्यात घालून पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना टाकळीचीवाडी येथे शनिवारी (दि.१७) रात्री २ वाजेच्या सुमारास घडली. गंगूबाई चंपालाल बिघोत (वय ४८) आणि चंपालाल तानासिंग बिघोत (५५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
दौलताबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टाकळीचीवाडी (ता. गंगापूर) येथील गट नंबर ९ मधील शेतात चंपालाल बिघोत एका मुलासह राहतात. त्यांचा एक मुलगा मुंबईतील पोलीस दलात आहे. दुसरा मुलगा त्यांच्यासोबत राहून शिक्षण घेतो. एका मुलीचा विवाह झालेला आहे. शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर हे कुटुंब झोपी गेले होते. मध्यरात्रीनंतर पती-पत्नीमध्ये वाद झाला. यामुळे संतप्त पती चंपालालने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा तुंबा घातला. तत्पूर्वी, त्याने मुलगा झोपलेल्या खोलीचा दरवाजा बाहेरुन लावला होता. पत्नी गंभीर जखमी झाल्याचे पाहून पतीने तेथून पळ काढला. आईच्या रडण्याचा आवाजामुळे मुलाला जाग आली. त्याने बाहेर येण्याचा प्रयत्न केला असता, दरवाजा बाहेरुन बंद होता. त्याने आरडाओरड केली. या आवाजाने घराजवळच राहणारे मुलाचे दोन मामा धावत आले. त्यांनी मुलाच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गंगूबाई यांना वाहनातून सुरुवातीला वेरुळ येथील रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासल्यानंतर प्रकृती गंभीर असल्यामुळे औरंगाबादेत नेण्याचा सल्ला दिला. रविवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गंगूबाई यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना काही वेळातच त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेची माहिती सकाळी ६ वाजता गावच्या पोलीसपाटलांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. दौलताबाद ठाण्याच्या निरीक्षक राजश्री आडे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. काही वेळातच पोलीस उपायुक्त वनिता वनकर, सहायक आयुक्त विवेक सराफ यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. घाटी रुग्णालयात दोन्ही मृतदेहाची उत्तरीय तपासणी करून रात्री उशिरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले.
विहिरीवर रक्ताने माखलेली कुऱ्हाड सापडली
गंगूबाई यांच्या मृत्यूनंतर चंपालाल यांचा शोध घेण्यास सकाळी सुरुवात केली. तेव्हा घराच्या जवळील विहिरीच्या काठावर रक्ताने माखलेली, त्याला महिलेचे केस लागलेली एक कुऱ्हाड आढळली, तसेच रक्ताने माखलेले कपडेही सापडले. चंपालालची चप्पलही तेथे आढळली. त्यामुळे त्याने विहिरीत आत्महत्या केल्याचा अंदाज आला. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी औरंगाबाद येथून अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी १५ मिनिटांत विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. त्यावरून पत्नीची हत्या करुन चंपालाल यांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर अधिकृतपणे खुनाची आणि आत्महत्येची तक्रार देण्यात येणार असल्याची माहिती गावच्या पोलीसपाटलांनी दिली.
Dr. Rajan Shinde Murder : डोक्यात घातलेले डंबेल, रक्त पुसलेले टॉवेल विहिरीत सापडले, चाकूचा शोध सुरु