आधी अतिवृष्टीमुळे नुकसान आता ई - केवायसीचा फटका; १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर
By विकास राऊत | Published: October 4, 2023 12:46 PM2023-10-04T12:46:40+5:302023-10-04T12:48:44+5:30
मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने नुकसानभरपाईपोटी निधी जाहीर केला. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेद्वारे हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याच्या प्रक्रियेमुळे ई-केवायसी वेळेत पूर्ण न करू शकलेले १५ हजार शेतकरी मदतीपासून दूर राहिले आहेत. ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांचा आकडा तालुक्यात सुमारे एक हजारपर्यंत आहे.
मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टी झाल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे शिल्लक राहिलेले पीकही वाया गेले. अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे नुकसानभरपाईपोटी शासनाने मराठवाड्यासाठी २ हजार ७०० कोटींची मदत दिली. यात जिल्ह्याला ४०० कोटींची रक्कम पहिल्या टप्प्यात होती. पहिल्या टप्प्यातील मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर गेली; मात्र त्यानंतरची मदत ऑनलाइन खात्यात जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यामुळे तलाठी, मंडळ अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या खातेनिहाय याद्या अपलोड करून त्या तहसीलदारांकडून निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवून प्रमाणित केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत गेले. यासाठी शेतकऱ्यांचे बँक खाते ई-केवायसी, आधार लिंक करणे गरजेचे होते.
ई-केवायसीमुळे मदत जमा झाली नसेल...
सततच्या पावसाची मदत जास्त होती. शासनाच्या सूचनेप्रमाणे खालील स्तरावरून नियमित झालेल्या यादीला मंजुरी दिल्यानंतर मंत्रालयातून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली गेली. जिल्ह्यात १२ ते १५ हजार शेतकऱ्यांपेक्षा जास्त जणांच्या खात्यावर मदत गेलेली नसेल. सामायिक खाते, जमिनीचा वाद या व इतर कारणांमुळे ई-केवायसीच्या अडचणी आल्या असतील. त्यामुळे मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली नसेल.
-- जनार्दन, निवासी उपजिल्हाधिकारी