हसण्या, रडण्याचा पहिला दिवस..!

By Admin | Published: June 17, 2014 12:03 AM2014-06-17T00:03:22+5:302014-06-17T01:12:40+5:30

लातूर : शाळेचा पहिला दिवस असल्याने विद्यार्थ्यांसह पालकांचीही पहाटेपासूनच लगबग होती़.

The first day of laughter, crying ..! | हसण्या, रडण्याचा पहिला दिवस..!

हसण्या, रडण्याचा पहिला दिवस..!

googlenewsNext

लातूर : शाळेचा पहिला दिवस असल्याने सोमवारी सकाळपासून विद्यार्थ्यांसह पालकांचीही पहाटेपासूनच लगबग होती़ नवे कपडे, नवीन पुस्तके, नवीन दप्तर पाठीवर घेऊन मुले शाळेकडे निघाली होती़ पाहिल्यांदाच शाळेत जाणारी चिमुकली रडत होती़ काही मुले नवीन शैक्षणिक साहित्य सोबत घेऊन आनंदाने शाळेकडे निघाली़ तब्बल दीड महिन्याच्या सुटीनंतर शाळेची सोमवारी शाळेची घंटा वाजली़ शाळेत मुलांची संख्या वाढावी यासाठी गावा-गावांत दवंडी देऊन जनजागृती करण्यात आल्याने पहिल्याच शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या़ अनेक पालक आपल्या पाल्यांना सोडण्यासाठी शाळेत आले असता काही विद्यार्थ्यांना शाळेत बसण्यासाठी रडू कोसळले़ शाळेची पहिल्यांदाच पायरी चढणारे विद्यार्थी चलबिचल झाल्याचे चित्र पहावयास मिळाले़
सोमवारची पहाट उजाडताच घराघरात मुलांना तयार करण्यासाठी पाल्यांची लगबग सुरू होती़ शाळेचा पहिला दिवस असल्याने मुलांना उत्सुकताही होती़ शिवाय धास्तीही़ कुठल्या वर्गात बसवणार, शिक्षक कोण असणार, रिक्षा, स्कूल बसचालक कसा आहे? असे प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात पडले होते़ गाडी दारात येऊन पोहोचताच जड अंतकरणाने पहिल्यांदाच शाळेत जाणाऱ्या मुलांनी बसमध्ये पाय टाकला़ तर काही पालकांनी शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेत जाऊन मुलांना सोडले़ जिल्हा परिषदेच्या १ हजार २८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती़
पहिल्याच दिवशी मुलांना मोफत गणवेश व पुस्तकांचे वाटप करण्यात आले असून गणवेश, पुस्तकांबरोबर मुलांना गुलाब पुष्प देऊन प्रत्येक शाळांत स्वागत करण्यात आले़ विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे, सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी स्वत:हून शाळांचा आढावा घेतल्याने शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केल्याने शहरासह ग्रामीण भागातील शाळा गजबजल्या होत्या़ जिल्हा परिषदेच्या प्रत्येक शाळांत स्वच्छता करण्यात आली होती़ रांगोळी व रंगकाम करून शाळा सजविल्या आहेत. सोमवारी प्रभातफेरी झाल्यानंतर प्रत्येक शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन पुढील वर्षभराचे नियोजन करण्यात आले़ नूतन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांबरोबर जुन्या विद्यार्थ्यांचेही स्वागत शाळास्तरावर करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी भाऊसाहेब तुपे यांनी सांगितले. जिल्ह्यात प्राथमिकच्या ९९०, उच्च प्राथमिकच्या ८१५, जिल्हा परिषदेच्या १२८५, खाजगीच्या ६३३ शाळा विद्यार्थ्यांनी गजबजून गेल्या होत्या़
चिमुकल्यांना खाऊ वाटप़़़
शहरातील श्रीकिशन सोमाणी विद्यालयात विद्यार्थ्यांना गोडी लागावी यासाठी गोड खाऊ दिला़ तसेच शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत केले़
चौधरी नगर भागातील एच़पी़ उर्दू शाळा, छत्रपती शिवाजी शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले़ वरवंटी जिल्हा परिषद शाळेत शिक्षणोत्सव साजरा करण्यात आला़
जनजागरण फेरी़़़
जिल्हा परिषदेच्या शाळांनी गावागावांत प्रभातफेरी काढून लहान मुले, शाळेत पाठवा अशा घोषणा दिल्या़
वरवंटी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सकाळी गावभर प्रभातफेरी काढली़ ढोल-ताशांचा गजर करीत मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन करण्यात आले़
श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पुस्तके वाटप करण्यात आली. संस्थाध्यक्ष शिवशंकर बिडवे, मन्मथप्पा लोखंडे, अभिमन्यू रासुरे, शिवशंकरप्पा खानापूरे, विश्वस्त के. एस.मांडे आदींची उपस्थिती होती.
‘लोकमत’कडून स्वागत...
शाळेच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून ‘लोकमत’ने मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे शाळांत जाऊन पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री देशीकेंद्र विद्यालय, श्री विद्याविकास प्राथमिक विद्यालय, श्री परिमल विद्यालय, श्री महात्मा बसवेश्वर प्राथमिक विद्यालय, श्री केशवराज प्राथमिक विद्यालय, श्रीकिशन सोमाणी विद्यालय, गोदावरीदेवी लाहोटी पाठशाळा, गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालय, मारवाडी राजस्थान विद्यालय, ज्ञानप्रकाश बालविकास केंद्र, श्री शिवाजी विद्यालय, राजमाता जिजामाता विद्यालय, श्री व्यंकटेश प्राथमिक विद्यालय, मनोज सहदेव अकॅडमी, अंबादास सूर्यवंशी प्राथमिक विद्यालय, छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालय, एच.पी. उर्दू प्राथमिक विद्यालय, सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, साने गुरुजी विद्यालयात ‘लोकमत’च्या कर्मचाऱ्यांनी जाऊन मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे स्वागत केले. वर्षभराच्या शैक्षणिक उपक्रमाला ‘लोकमत’ने शुभेच्छाही व्यक्त केल्या. ‘लोकमत’च्या स्वागत उपक्रमाचे मुख्याध्यापकांनीही भरभरून कौतुक केले.

Web Title: The first day of laughter, crying ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.