महापालिकेच्या करवसुली अभियानाच्या पहिल्या दिवशी ५२ लाख वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 05:33 PM2018-11-13T17:33:03+5:302018-11-13T17:33:36+5:30
मालमत्ताकर, पाणीपट्टी, अनधिकृत नळ, अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी महापालिकेने वसुली आणि नियमितीकरण मोहीम सुरू केली.
औरंगाबाद : दिवाळीनंतर करवसुलीसाठी रस्त्यावर उतरणार असे जाहीर केलेल्या महापालिकेचे पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचारी आज रस्त्यावर उतरले. पहिल्या दिवशी सुमारे ५२ लाख रुपये इतकी वसुली करण्यात आली.
मालमत्ताकर, पाणीपट्टी, अनधिकृत नळ, अनधिकृत घरे नियमित करण्यासाठी महापालिकेने वसुली आणि नियमितीकरण मोहीम सुरू केली. पहिल्याच दिवशी नागरिकांनी वॉर्ड कार्यालयांमध्ये रांगा लावून पैसे भरले. ७५ टक्के दंड माफ करण्यात येत असल्याने कर भरण्यासाठी नागरिक पुढे येत आहेत. दिवसभरात नऊ वॉर्ड कार्यालयांमध्ये सव्वाकोटीहून अधिक रक्कम जमा झाल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. प्रोझोन मॉलधारकाकडे तब्बल ७ कोटी रुपये थकले होते. त्यासाठी महापौर ३ तास तळ ठोकून होते.
यंदाचे महापालिकेचे उद्दिष्ट सुमारे ४५० कोटी रुपये आहे. ड्रेनेज चोकअप काढण्यासाठीही कंत्राटदार येण्यास तयार नाहीत. त्यामुळे मनपा प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून वसुली आणि नियमितीकरण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवस ही मोहीम चालणार असून, किमान ५० कोटी रुपये तरी तिजोरीत यावेत अशी अपेक्षा आहे. सोमवारी सकाळी वॉर्ड क्र. १ येथे योजनेचे उद्घाटन महापौर नंदकुमार घोडेले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विरोधीपक्षनेता, गटनेता, सभागृहनेता विकास जैन, आयुक्त डॉ. निपुण विनायक, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त डी.पी. कुलकर्णी, वसंत निकम, महावीर पाटणी, ए.बी. देशमुख आदींची उपस्थिती होती.
यंदा मालमत्ता कराचे उद्दिष्ट ४५० कोटी असून, मागील वर्षी ८० कोटी वसूल झाले होते. यंदा सर्वाधिक वसुलीचा विक्रम करण्यात येईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली. नागरिकांना या मोहिमेत जुना कर भरून ७५ टक्के व्याज माफ करून घेता येईल. अनधिकृत नळ, अनधिकृत घर नियमित करून घेता येईल. याचा जनतेने लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर घोडेले यांनी केले.
प्रोझोन मॉलवर कारवाईचा बडगा...
सकाळी ८ ते दुपारी २ पर्यंत मालमत्ता वसुलीसाठी नेमलेल्या भरारी पथकांनी काम केले. त्यानंतर वॉर्ड कार्यालयांनी थकबाकीदारांची यादी काढून पैसे भरून घेण्यासाठी पाठपुरावा केला. वॉर्ड कार्यालयांमध्ये पैसे भरण्यासाठी रांगा लागल्या होत्या. प्रोझोन मॉलधारकाकडे मनपाचे करापोटी ६ कोटी ९८ लाख रुपये थकले आहेत. ही रक्कम एवढी नसून, ३ कोटी ९० लाख असल्याचे प्रोझोन मॉल प्रशासनाचे म्हणणे होते. महापौर घोडेले दुपारी ४ वाजेपासून या मॉलमध्ये ७ कोटींच्या वसुलीसाठी तळ ठोकून होते. दोन दिवसांत हा वाद संपुष्टात आणून पैसे भरण्याचे आश्वासन प्रोझोन मॉल प्रशासनाने दिले. मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे थकबाकीसाठी मनपा पदाधिकारी तळ ठोकून बसणार आहेत.
अधिकाऱ्यांची नकारात्मकता
शहरातील तब्बल २० हजार नागरिकांच्या मालमत्तांची मनपाने दोनदा नोंद केली आहे. एका नागरिकाला दोनदा कर लावण्याचा प्रताप करून ठेवला आहे. मालमत्ता कर रद्द करा, अशी मागणी करीत नागरिक वॉर्ड कार्यालयांमध्ये येत आहेत. त्यांना जागेवरच दिलासा देण्याचे काम अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून आले. १४०० रुपये भरून नळ अधिकृत करा, अशी घोषणा मनपाने केली. प्रत्यक्षात नागरिक वॉर्ड कार्यालयात गेल्यावर ५ हजार रुपये दंड, ४ हजार नळपट्टी चालू वर्षाची आणि १४०० रुपये असे एकूण १० हजार ४०० रुपये भरा असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे आल्या पावली नागरिक परत फिरत आहेत.
आजची वसुली
वॉर्ड मालमत्ताकर पाणीपट्टी
१ ४ लाख ७५ हजार २ लाख १० हजार
२ २ लाख ८२ हजार ४६ हजार
३ २ लाख २४ हजार ४२ हजार
४ ३ लाख ०६ हजार २ लाख ३६ हजार
५ ५ लाख ०९ हजार २ लाख ०७ हजार
६ १ लाख ८८ हजार १ लाख २० हजार
७ ५ लाख ९२ हजार १ लाख ९४ हजार
८ ३ लाख ७१ हजार २० हजार
९ ८ लाख ६९ हजार ३ लाख ६३ हजार
एकूण ३८ लाख १६ हजार १४ लाख ३८ हजार