पहिली निवडणूक, पहिले मतदान अन् पहिल्या खासदाराचेही अप्रूपही...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 11:08 PM2019-03-31T23:08:51+5:302019-03-31T23:09:03+5:30
देशातील पहिली निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय, ते कसे करतात आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता व त्याचे प्रत्यंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाले.
शांतीलाल गायकवाड
औरंगाबादचे पहिले खासदार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य : एस. के. वैशंपायन यांचा पराभव
औरंगाबाद : देशातील पहिली निवडणूक, पहिलेच मतदान, पहिला खासदार, मतदान म्हणजे काय, ते कसे करतात आदी अनेक प्रश्न व ९० टक्के निरक्षर समाज, या पार्श्वभूमीवर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात १९५२ मध्ये निवडणूक झाली. या पहिल्या निवडणुकीत जनमानसावर काँग्रेसचा प्रचंड पगडा होता व त्याचे प्रत्यंतर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य हे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार एस. के. वैशंपायन यांचा दणदणीत पराभव करून विजयी झाले.
इंग्रजाच्या दीडशे वर्षांच्या गुलामीतून मुक्त झाल्यानंतर भारतात २५ आॅक्टोबर १९५१ ते २२ फेब्रुवारी १९५२ या काळात पहिल्या लोकसभेसाठी मतदान झाले. चार महिने व तब्बल ६८ टप्प्यांत मतदान चालले. त्यात औरंगाबादेत जानेवारी १९५२ मध्ये मतदान झाले. परंतु तेव्हा देशाची साक्षरता २० टक्क्यांहून तर मराठवाड्याची १० टक्क्यांहून कमी होती. त्यामुळे मतदान प्रक्रियेची माहिती नागरिकांनाच काय तर प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनाही नव्हती. हैदराबादच्या निजामावर लष्करी कारवाई करून सप्टेंबर १९४८ मध्ये हे संस्थान भारतात विलीन करण्यात आले. तेव्हा मराठवाडा व कर्नाटकातील काही भूभाग मिळून १९४८ मध्ये हैदराबाद हे स्वतंत्र राज्य तयार करण्यात आले. मराठवाड्यात तेव्हा सहा जिल्हे होते. औरंगाबाद व जालना हा एकच जिल्हा होता. निरक्षर देशाला मतदानाविषयी माहिती कळावी म्हणून देशभरात आॅक्टोबर १९५१ मध्ये ‘मॉक इलेक्शन’ही (निवडणुकीचा सराव) घेण्यात आले होते.
प्रत्येक उमेदवाराची स्वतंत्र मतपेटी
भारताचे पहिले निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली. निवडणुकीत अगदीच नवखा असलेला व प्रचंड विस्तारलेल्या देशात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ व ४८९ जागा होत्या. निरक्षर मतदारांना मतदान करणे सोपे जावे यासाठी प्रत्येक उमेदवाराच्या नावाची स्वतंत्र मतदान पेटी मतदान केंद्रावर ठेवली होती. या मतपेटीला वेगवेगळा रंग होता. त्यावर उमेदवाराचे नाव व निवडणूक चिन्ह चिकटविण्यात आलेले होते. जेवढे उमेदवार तेवढ्या मतपेट्या ठेवल्या होत्या. मतदार ज्यांना मतदान करायचे त्याच्या पेटीत मतपत्रिका टाकत असत.
औरंगाबादेत काँग्रेस व पीडीएफमध्ये लढत
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून तेव्हा एकूण किती उमेदवार निवडणूक रिंगणात होते,
याची अधिकृत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. परंतु भारतीय निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर निवडणुकीचे निकाल, विजेते व उपविजेत्या उमेदवारांची यादीनुसार भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार सुरेशचंद्र शिवप्रसाद आर्य हे विजयी झाले होते. त्यांना ७१ हजार ९२ मते मिळाली. त्यांचे प्रतिस्पर्धी पीडीएफचे एस.के. वैशंपायन यांना ३५ हजार ८६९ मते मिळाली होती. आर्य यांनी वैशंपायन यांचा तब्बल ३५ हजार २२३ मतांनी दणदणीत पराभव केला होता. हैदराबाद राज्यातील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचा क्रमांक तेव्हा ११ होता. तर मतदारसंघ सर्वसाधारण गटात आणि एक उमेदवाराचा होता.
असे होते मतदारसंघ
पहिल्या लोकसभेसाठी देशभरात लोकसभेचे ४०१ मतदारसंघ होते, तर ४८९ जागा होत्या. ३१४ मतदारसंघ एक सदस्यीय तर ८६ मतदारसंघ दोन सदस्यीय होते. त्यात एक सदस्य सर्वसाधारण तर दुसरा सदस्य राखीव प्रवर्गातील एससी अथवा एसटीचा होता. पहिल्या निवडणुकीत देशभरात १८४९ उमेदवार उभे होते. ३६ कोटी लोकसंख्येच्या देशातील २१ वर्षे वय पूर्ण करणारे १७ कोटी ३० लाख मतदार होते. त्यातील ४५.७ टक्के मतदान घेऊन काँग्रेसने ३६४ जागांवर विजय मिळविला होता. तेव्हा फक्त दोन पक्षाने विजयी उमेदवारांचा डबल आकडा गाठला होता. त्यात सीपीआयचे १६ व सोशालिस्ट पार्टीचे १२ खासदार विजयी झाले. भारतीय जनसंघाचे ३ खासदार निवडून आले. १७ एप्रिल १९५२ रोजी देशाची पहिली लोकसभा अस्तित्वात येऊन पंडित जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान झाले.
औरंगाबादच्या प्रथम खासदाराचा अल्पपरिचय
डॉ. सुरेशचंद्र आर्य यांचा जन्म १८ मे १९१२ रोजी झाला. ते हैदराबाद येथील हिमायतनगरचे मूळ रहिवासी होते. उच्चविद्याविभूषित असलेले डॉ. आर्य यांना विद्यालंकार या उपाधीने गौरविले होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण हरिद्वार येथील गुरुकुलातून झाले. पुढे ते पॅरिस (फ्रान्स) मधून डी. लिट. झाले. जर्मनीमधूनही त्यांनी शिक्षण घेतले. सत्याग्रहात सहभागी झाल्याने त्यांना १९३० मध्ये कारागृहात जावे लागले. ते १९३६-३७ या काळात बॉम्बे समाचार पत्रिकेचे संपादक होते. पुढे पदव्युत्तर शिक्षणासाठी परदेशात वास्तव्याला असताना त्यांचा संबंध क्रांतिकारकांशी आला. १९३७ ते १९४७ या काळात ते आझाद हिंद सेनेच्या आझाद हिंद रेडिओचे प्रमुख होते. बर्लिनमध्ये राहून ते हे काम पाहत होते. व्हिएन्नात १९५४ मध्ये झालेल्या इंटर पार्लमेंटली कॉन्फरन्समध्ये त्यांचा सहभाग होता.