मराठा विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:00 AM2018-08-13T01:00:57+5:302018-08-13T01:01:21+5:30
मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे
विकास राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाची सुरुवात ज्या जिल्ह्यातून झाली. त्या औरंगाबाद जिल्ह्यात मराठा समाजाच्या गरजू मुला-मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह १ सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी शक्यता आहे. वसतिगृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने छावणी परिसरातील निजाम बंगला येथील ३२ क्वॉर्टर उपलब्ध करून दिले आहेत. जिल्हाधिकारी उदय चौधरी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण व अन्य अधिकाऱ्यांनी त्या क्वॉर्टरची पाहणी केली आहे. इतर सुविधांसाठी निविदा काढल्या आहेत. १ सप्टेंबरपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू होईल, या दिशेने जिल्हा प्रशासन आणि बांधकाम विभागाची यंत्रणा काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठा समाजातील होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वसतिगृह असावे, अशी आरक्षणासह विविध मागण्यांपैकी एक असलेली मागणी मराठा क्रांती मोर्चाने प्रत्येक मोर्चामध्ये लावून धरली आहे. ९ आॅगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनातदेखील मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वसतिगृहाच्या मागणीचा उल्लेख करण्यात आला. समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी पहिले वसतिगृह कोल्हापूर येथे सुरू झाले आहे. दुसरे वसतिगृह औरंगाबादेत सुरू होत आहे. हळूहळू राज्यभर वसतिगृह सुरू होतील, असा दावा सूत्रांनी केला.
सूत्रांनी सांगितले, वसतिगृहाची जागा निश्चित केली आहे. निजाम बंगला परिसरात बांधकाम विभागाचे क्वॉर्टर आहेत. छावणी पोस्ट आॅफिसच्या बाजूला क्वॉर्टर आहेत. मागील काही वर्षांपासून ते क्वॉर्टर विभागाने कुणालाही राहण्यासाठी दिलेले नाहीत. त्यांची डागडुजी, रंगरंगोटी करण्यात आली आहे. ३२ क्वॉर्टर दुरुस्त केले असून, ते मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. १५ तारखेपर्यंत जिल्हाधिकाºयांनी विविध स्वयंसेवी संस्थांकडून वसतिगृह व्यवस्थापनासाठी निविदा मागविल्या आहेत. ३० मुली आणि ७० मुलांची त्या वसतिगृहात आवास-निवासाची व्यवस्था करण्यात येईल.