कळंबमध्ये जिल्ह्यातील पहिले इनडोअर स्टेडिअम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2017 12:40 AM2017-02-26T00:40:52+5:302017-02-26T00:42:03+5:30
कळंब : शिक्षणक्षेत्रात नावाजलेल्या कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ कॅम्पसमध्ये जिल्ह्यात पहिलेच इनडोअर स्टेडीयम महाविद्यालयाने साकारले
कळंब : शिक्षणक्षेत्रात नावाजलेल्या कळंब येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या डिकसळ कॅम्पसमध्ये जिल्ह्यात पहिलेच इनडोअर स्टेडीयम महाविद्यालयाने साकारले असून, त्यासाठी एक कोटी २९ लक्ष रूपये खर्च आला आहे़ यामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे़
येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचा हावरगाव रोड व ढोकी रोडवरील डिकसळ परिसरात मोठा कॅम्पस आहे. डॉ़ अशोकराव मोहेकर यांच्या संकल्पनेतून आजवर महाविद्यालयात विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत़ महाविद्यालयातील खेळाडुंनी राज्यासह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये नवलौकिक मिळविला आहे़ या खेळाडुंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविध मिळाव्यात व याद्वारे क्रिडा विकास साधावा या उद्देशाने प्राचार्य डॉ.अशोक मोहेकर यांनी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोगाकडे इनडोअर स्टेडियमचा प्रस्ताव सादर केला होता. यास विद्यापीठ अनुदान आयोगाने २०११ साली मंजूरी देवून ७० लाखाचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर काही काळातच या स्टेडियमची मुहूर्तमेढ रोवण्यात आली होती. विद्यापीठ अनुदान आयोगाने मंजूर केलेल्या इनडोअर स्टेडियमची उभारणी आपल्या डिकसळ भागातील विस्तिर्ण कॅम्पसमध्ये करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तांत्रिकदृष्ट्या अभ्यासू व्यक्तिकडून याचा आराखडा तयार करुन घेतला. यानुसार तयार झालेले इनडोअर स्टेडीअम हे तब्बल १५०० स्क्वेअर मीटर एवढे विस्तिर्ण आहे़ यात खेळाडू निवासासाठी १८ स्वतंत्र कक्ष आहेत. या स्टेडियममध्ये बॅडमिटन, ज्यूदो, बुद्धीबळ, टेबल टेनिस, बॉक्सींग, कुस्ती, खो-खो, क्वॉश आदी खेळासाठी खेळाडू उपयोग करु शकणार आहेत़
या स्टेडियमचे उद्घाटन शुक्रवारी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज माने यांच्याहस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी आ. विक्रम काळ होते. तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या लातूर उपकेंद्राचे संचालक डॉ. दिपक देशमुख, क्रीडा संचालक जनक टेकाळे, संस्थेचे अध्यक्ष प्रा.आबासाहेब बारकूल, सचिव प्राचार्य डॉ. अशोकराव मोहेकर, डॉ.आप्पासाहेब हुंबे, प्राचार्य डॉ. सूर्यकांत जगदाळे, प्रा. श्रीकृष्ण चंदनशीव, प्रा.श्रीधर भवर यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ.मोहेकर यांनी या स्टेडियममुळे आंतरारष्ट्रीय सुविधा उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. प्रास्ताविक क्रीडा विभागप्रमुख डॉ. बी. एन. गपाट, सूत्रसंचालन डॉ. सुनील पवार यांनी तर आभार डॉ. व्ही. एस. अनिगुंठे यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा. सतीश लोमटे, प्रा. बोंदर, प्रा. एस. एस. वायबसे, प्रंबधक एस. एस. जाधव, अरविंद शिंदे आदींनी परिश्रम घेतले़ (वार्ताहर)