औरंगाबादचे पहिले महापौर शांताराम काळे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 06:39 PM2019-04-21T18:39:07+5:302019-04-21T18:40:57+5:30
१७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले.
औरंगाबाद : शहराचे पहिले महापौर डॉ. शांताराम यशवंतराव काळे (७३) यांचे शनिवारी पहाटे (दि. २१ ) अल्पशा आजाराने निधन झाले. दुपारी त्यांच्या पार्थिवावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ज्योतीनगर येथील रहिवासी डॉ. शांताराम काळे यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. याचवेळी त्यांनी सामाजिक क्षेत्रात काम सुरू केले. १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाली. महापालिकेच्या ६० जागांसाठी पहिली निवडणूक १७ एप्रिल १९८८ रोजी घेण्यात आली. या निवडणुकीत क्रांतीचौक वॉर्डातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले होते.
काँग्रेस, दलित पॅथर, मुस्लिम लीग आणि अपक्षांचे संख्याबळ जास्त असल्यामुळे १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून डॉ. शांताराम काळे विजयी झाले. उपमहापौर म्हणून तकी हसन खान विराजमान झाले होते. महापौरांचा वर्षभराचा कार्यकाळ असल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराला मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी त्यांनी काम केले. ५ जुलै १९८९ रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला. नगरसेवक म्हणून त्यांनी चार वर्षे अत्यंत चांगले काम केले होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात वाहून घेतले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
शनिवारी दुपारी त्यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघाली. प्रतापनगर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. महानगरपालिकेच्या वतीने महापौर नंदकुमार घोडेले यांनी काळे यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, विविध राजकीय पक्षाचे आजी, माजी नगरसेवक, पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारकीर्द
- १९८२ मध्ये औरंगाबाद महापालिकेची स्थापना
- १७ एप्रिल १९८८ रोजी नगरसेवक म्हणून निवडून आले.
- १७ मे १९८८ रोजी शहराचे पहिले महापौर म्हणून निवड.