रात्री १२ वाजता फटाके फोडल्याचा पहिला गुन्हा हर्सूल ठाण्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2018 06:41 PM2018-11-12T18:41:45+5:302018-11-12T18:42:33+5:30
ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते.
औरंगाबाद : हर्सूल परिसरातील जटवाडा रोडवर एका अपार्टमेंटसमोर बुधवारी रात्री फटाक्यांची आतषबाजी करून अंधारत पसार होणाऱ्यावर न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये, ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते. हर्सूल ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, डीबी पथकप्रमुख कल्याण चाबूकस्वार, सहायक फौजदार उत्तम गिरी, हवालदार शेख महेबूब, शेख शरीफ, बाळासाहेब घोडके हे गस्तीवर असताना त्यांंना जटवाडा रस्त्यावर फटाक्यांची आतषबाजी होत असल्याचा आवाज रात्री १२ वाजेच्या सुमारास ऐकू आल्याने गस्ती पथकाचे वाहन त्या दिशेने गेले. सहारा वैभवसमोर आले असता अंधारात फटाके वाजवून उल्लंघन करणाऱ्यांनी पळ काढला.
परिसरात शोध घेतला; परंतु ते मिळून आले नाही. शहरातील इतर ठाण्यांत गुन्हा दाखल झाल्याचे वृत्त आले नाही. पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी गुन्हे दाखल करण्याचे सुचविल्याने पथक गस्तीवर होते. डीबी पथकाचे कल्याण चाबूकस्वार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोहेकॉ. गोरख उबाळे करीत आहेत.
इतर ठाण्यांत निरंक
न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होऊ नये म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांसोबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी चर्चा करून नियमांचे पालन करा, अशा सूचना केल्या होत्या; परंतु दिवाळी सणात सदरील आदेशाचे विविध ठाण्यांच्या हद्दीत उल्लंघन झाले असले तरी दिवाळीच्या धामधुमीत पोलीस कर्मचाऱ्यांनीच कानाडोळा केला की काय, असा संशय स्थानिक नागरिकांतून उपस्थित होत आहे. विविध ठाण्यात फटाके फोडण्यावरून वाद हाणामारीचे गुन्हे दाखल झालेले आहेत; परंतु नियमाचे उल्लंघनाचे निरंक असेच उत्तर मिळाले. सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे म्हणाले की, फटाके फोडल्याप्रकरणी वेगवेगळ्या ठाण्यांत अकरा गुन्हे दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्याजवळ फटाके फोडून पलायन
दुसऱ्या घटनेत, जिन्सी पोलीस ठाण्याजवळील जिन्सी चौकात १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास एक जण फटाके वाजवित होता. त्यावेळी पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पसार झाला. त्याचा शोध पथकाने उशिरापर्यंत घेतला; परंतु तो मिळून आला नाही. याप्रकरणी सहायक फौजदार आयुब खान उस्मान खान पठाण यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार शेख शकील करीत आहेत.