पहिल्या टप्प्यात चव्हाण गटाकडे ३७ पैकी २७ जागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 01:22 AM2017-11-28T01:22:14+5:302017-11-28T01:22:16+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आ. सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचे विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेतलेल्या ५ जागांची पुनर्मतमोजणी करत विजयी उमेदवारांना सायंकाळी उशिरा प्रमाणपत्र प्रदान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात झालेल्या ३७ जागांची मतमोजणी पूर्ण झाली आहे. अधिसभा आणि विद्यापरिषदेच्या ३७ पैकी तब्बल २७ जागा आ. सतीश चव्हाण समर्थक उत्कर्ष पॅनलला मिळाल्या असल्याचे विजयी उमेदवार डॉ. राजेश करपे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. साधना पांडे यांनी आक्षेप घेतलेल्या ५ जागांची पुनर्मतमोजणी करत विजयी उमेदवारांना सायंकाळी उशिरा प्रमाणपत्र प्रदान केले.
विद्यापीठ अधिसभेच्या २९ आणि विद्यापरिषदेच्या ८ जागांची मतमोजणी दोन दिवसांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर पूर्ण झाली आहे. यात पदवीधरचे आ. सतीश चव्हाण यांच्या उत्कर्ष पॅनलला अधिसभेत २० आणि विद्यापरिषदेच्या ७ जागा जिंकल्या आहेत. यातील महाविद्यालयीन प्राध्यापक गटातील आरक्षित पाच जागांचे निकाल राखीव ठेवले होते. विद्यापरिषदेची मतमोजणी झाल्यानंतर राखीव ठेवलेल्या आरक्षित जागेचे पुनर्मतमोजणी करत सर्व विजयी उमेदवारांना रात्री उशिरा प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती विजयी उमेदवार डॉ. फुलचंद सलामपुरे यांनी दिली. विद्यापीठ विकास मंचचा प्राचार्य गटात चार, प्राध्यापकात दोन आणि विद्या परिषदेत एक उमेदवार विजयी झाला आहे.
कोणतेही कारण नसताना रात्री गोंधळ
मतमोजणी कक्षात बसविण्यात आलेला टेबल तुटल्यामुळे काही मतपत्रिका बाजूला ठेवल्या होत्या. यात एका केंद्राच्या ८३ मतपत्रिकांचा समावेश होता. आरक्षित प्रवर्गातील जागांमध्ये दोन उमेदवारांमध्ये सरळ लढत असल्यामुळे या मतपत्रिकांचा आकडा जुळवला नाही. त्याकडे दोन्ही गटांच्या उमेदवारांनीही लक्ष वेधले नाही. मात्र खुल्या प्रवर्गातील मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर एकूण मतपत्रिकांमध्ये ८३ मतपत्रिका कमी भरत असल्याचे लक्षात आले. तेव्हा शोधाशोध केली असता, एका मतपेटीत ८३ मते सापडली. त्यात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिकाही होत्या. मात्र आरक्षित प्रवर्गाची मतमोजणी पूर्ण झाली होती. तेव्हाच एका गटाच्या उमेदवारांनी मतमोजणी थांबवत मतदान पुन्हा घेण्याची मागणी केली. ही मागणीच कायद्याला धरून नव्हती. यामुळे पोलीस संरक्षणात आरक्षित प्रवर्गातील मतपत्रिका सीलबंद केल्या असल्याचे डॉ. साधना पांडे यांनी सांगितले. दरम्यान, सायंकाळी उशिरा आक्षेप घेतलेल्या उमेदवारांना बोलावून पुनर्मतमोजणी करण्यात आली. मात्र या मतमोजणीकडे विद्यापीठ विकास मंचच्या उमेदवारांनी पाठ फिरवली.
पराभव झाल्यामुळे बेछूट आरोप
विद्यापीठ विकास मंचने राज्य सरकार, केंद्र सरकारमधील असलेल्या सत्तेच्या जोरावर विजयी होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, ते धुळीस मिळाल्यामुळे आ. सतीश चव्हाण यांच्यावर बेछूट आरोप करण्यात येत असल्याचे उत्कर्ष पॅनलचे निमंत्रक डॉ. शिवाजी मदन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच उत्कर्ष पॅनलचा दणदणीत विजय झाला असून, आगामी पाच वर्षांत विद्यार्थी हिताचे निर्णय घेत विद्यापीठाला गतवैभव मिळवून देणार असल्याचे सांगितले.