पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण

By विकास राऊत | Published: February 1, 2024 07:29 PM2024-02-01T19:29:05+5:302024-02-01T19:29:14+5:30

नागरिक आंदोलनाच्या तयारीत : पुंडलिकनगर परिसरात गुन्हेगारीचा आलेख चढता

First struggle for facilities in Pundliknagar area, now insecure environment | पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण

पुंडलिकनगर परिसरात आधी सुविधांसाठी संघर्ष, आता असुरक्षित वातावरण

छत्रपती संभाजीनगर : १९९० च्या दशकात उदयास आलेली पुंडलिकनगर या वसाहत व परिसराला सुमारे दीड ते दोन दशक नागरी सुविधांसाठी संघर्ष करावा लागला. वसाहतीच्या स्थापनेला रक्तरंजित इतिहास आहे. संघर्षाचा लढा संपून काही काळ लोटत नाही तोवरच आता या परिसरात वाढत्या गुन्हेगारी आणि नशेखोरांमुळे असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे.

वाटमारी, महिलांची छेड काढणे, टवाळखोरांचे टोळके मोकळ्या जागेत बसणे, गल्लीच्या तोंडावरील पान टपऱ्यांवर रहिवाशांसोबत वाद घालणे. किरकोळ वादातून हत्याराने हल्ले करण्याचे प्रमाण वाढले आहे. शून्य पोलिसिंगमुळे हा सगळा प्रकार फोफावत असून बाहेरच्या परिसरातून येणाऱ्या टवाळखोरांमुळे परिसर असुरक्षित झाला आहे. त्यामुळे अनेक नागरिकांनी आपल्या मालमत्ता विक्रीस काढल्या आहेत. शासकीय, निमशासकीय कर्मचारी, कंपनी कामगारांसह हातावर पोट असणाऱ्यांचा हा परिसर आहे. परिसरात पुंडलिकनगरसह न्यू हनुमाननगर, न्यायनगर, हुसेन कॉलनी, गजाननगनर, मातोश्रीनगर, भारतनगर, अलंकार हाउसिंग सोसायटी आदी वसाहती आहेत. गजानन महाराज मंदिर ते पुंडलिकनगर मार्गे जयभवानीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर मद्य विक्रीची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत.

नागरी आंदोलन उभारणार
पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले आहे. हनुमान चौक परिसरात रिक्षा स्टॅण्ड, पाण्याच्या टाकीखाली मद्यपान खुलेआम केले जाते. महिलांना बाहेर फिरणे अवघड झाले आहे. नागरी आंदोलन उभारण्याविना पर्याय नाही.
-अशोक दामले, भाजप पदाधिकारी

असुरक्षिततेची भावना
पोलिसांची गस्त वाढणे गरजेचे आहे. नशेखाेरांवर कारवाई करणे गरजेचे आहे. सगळ्या पुंडलिकनगर परिसरात बाहेरच्या वसाहतींमधून येणाऱ्यांमुळे वातावरण असुरक्षित होत आहे. परिणामी गुन्हेगारीचा आलेख वाढला असून महिलांसह नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे.
-मीना गायके, माजी नगरसेविका

पोलिसांचा वचक नाही
बटन, अवैध दारू, गांजाची विक्री वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी तलवार घेऊन बाहेरच्या वसाहतीतून टवाळखोर आले होते. किरकोळ वादातून हल्ला, खून करण्याचे प्रकार वाढत आहेत. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नशेमध्ये हाणामारी होत आहे. पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे प्रकार होत आहेत.
-दिग्विजय शेरखाने, माजी नगरसेवक

स्त्यावर  फिरणे अवघड
व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. अनधिकृत रिक्षा स्टॅण्डची संख्या वाढली आहे. हनुमान चौकासह पूर्ण रस्त्यावर सामान्यांना फिरणे अवघड झाले आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे.
-बापू कवळे, ठाकरे गट पदाधिकारी

गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
पुंडलिकनगर रोडवर स्पीड ब्रेकर्स टाकण्याच्या मागणीकडेदेखील दुर्लक्ष केले जात आहे. तसेच, रात्री उशिरापर्यंत पोलिसांची गस्त वाढली पाहिजे. अलीकडच्या काळात पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
- सोनू अहिले, युवा सेना पदाधिकारी

Web Title: First struggle for facilities in Pundliknagar area, now insecure environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.