आधी अतिक्रमण हटवली, आता मनपाने फक्त ५०० रुपयांत व्यापाऱ्याला भाड्याने दिला फुटपाथ
By मुजीब देवणीकर | Published: October 16, 2024 02:26 PM2024-10-16T14:26:32+5:302024-10-16T14:28:01+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या झोन क्रमांक ७ मधील प्रताप
छत्रपती संभाजीनगर : शहरातील फुटपाथ फक्त नागरिकांना चालण्यासाठीच मोकळे असावेत, अशी सक्त ताकीद खंडपीठाने महापालिकेला दिली आहे. त्यानंतरही झोन क्रमांक ७ मधील एका अधिकाऱ्याने गजानन महाराज मंदिर परिसरातील फुटपाथ एका व्यापाऱ्याला दिवाळीनिमित्त दुकाने लावण्यासाठी अवघ्या ५०० रुपयांमध्ये एक महिन्यासाठी भाड्याने देऊन टाकला. या निर्णयामुळे महापालिकेतील अधिकारीच आश्चर्य व्यक्त करीत आहेत.
शहरातील सर्व मुख्य रस्ते मोकळे असावेत यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रशासक जी. श्रीकांत, अतिक्रमण हटाव विभागाचे अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुळे यांच्यासह वॉर्ड अधिकारी परिश्रम घेत आहेत. मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन सातत्याने कारवाया करण्यात येत आहेत. सकाळी आणि संध्याकाळी कुठेही वाहतूक कोंडी होता कामा नये याची खबरदारी घेतली जात आहे. दिवाळीनिमित्त शहरात मुख्य रस्त्यांवर कुठेही दुकाने लागणार नाहीत, यासाठी अतिक्रमण हटाव विभाग डोळ्यात तेल ओतून पाहणी सुद्धा करीत आहे. त्यातच झोन क्रमांक ७ मधील कार्यालयीन अधीक्षक विलास भणगे यांनी एका व्यापाऱ्याला गजानन महाराज मंदिररोडवर कडा कार्यालयासमोरील फुटपाथ दुकाने थाटण्यासाठी अवघ्या ५०० रुपयांमध्ये देऊन टाकले. एक महिन्यांसाठी हे फुटपाथ दिल्याचा ऑर्डरमध्ये उल्लेख आहे. वाहतूक पोलिस आणि धर्मादाय आयुक्त यांचे नंतर ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे असेही नमूद केले. दुकानांच्या समोर रस्ता ७५ टक्के खुला असावा, दुकानांमध्ये ठराविक अंतर असावे, अग्निरोधक यंत्रणा असावी अशा तब्बल १९ अटी-शर्थी टाकण्यात आल्या आहेत.
फुटपाथ देण्याचे धाेरणच नाही
शहरात दसरा, दिवाळी, ईद आदी सणानिमित्त फुटपाथवर दुकाने लावण्यासाठी महापालिका प्रशासनाने धोरणच निश्चित केलेले नाही. त्यासाठी सर्वसाधारण सभेची परवानगी लागते. सभेने अशा पद्धतीचा कोणताही ठराव घेतला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मनपानेच हटविली अतिक्रमणे
गजानन महाराज मंदिराजवळील अतिक्रमणे तीन महिन्यांपूर्वी मनपानेच हटविली. ही अतिक्रमणे काढताना मनपाला बराच त्रास सहन करावा लागला होता. या कारवाईनंतर ज्येष्ठ नागरिकांनी मनपा अधिकाऱ्यांचे कौतुक केले होते.
निश्चित चौकशी होईल
दिवाळीनिमित्त फुटपाथ भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भात प्रशासक यांच्या स्तरावर कोणता निर्णय झाला का हे बघावे लागेल. खंडपीठाचे आदेश फुटपाथ रिकामे ठेवण्यासंदर्भात आहेत. वॉर्ड स्तरावर कोणी परवानगी दिली असेल तर त्याची चौकशी करून निश्चित कारवाईचा अहवाल प्रशासक यांना सादर केला जाईल.
- संतोष वाहुळे, अतिरिक्त आयुक्त, मनपा