३८ वर्षांत पहिल्यांदाच विकासचक्र थांबले; महापालिकेच्या स्वप्नांवर कोरोनाने फेरले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:02 PM2021-01-02T12:02:40+5:302021-01-02T12:07:50+5:30
Corona spoil the Aurangabad Municipality dreams : मार्चअखेरपर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेली कामे होण्याची शक्यता जवळपास धूसर आहे.
- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : शहराच्या विकासाचा अर्थसंकल्प दरवर्षी महापालिकेतील सत्ताधारी तयार करून अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडे सादर करतात. २०२०-२१ या आर्थिक वर्षात महापालिका प्रशासनाने स्वतः अर्थसंकल्प तयार केला. शहरात अनेक चांगली विकासकामे करण्याचा संकल्प यामध्ये होता. मात्र कोरोनारुपी राक्षसाने महापालिकेच्या स्वप्नांवर पाणी पेरण्याचे काम केले. मागील नऊ महिन्यांमध्ये तिजोरीत जेवढे पैसे येणे अपेक्षित होते तेवढे न आल्यामुळे एकही विकासकाम प्रशासनाला करता आले नाही.
महापालिकेतील सत्ताधारी दरवर्षी शहर डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करीत नाहीत. ११५ वॉर्ड डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात येतो. शहर म्हणून जी विकासकामे करायला हवीत ती होत नाहीत. यंदा महापालिकेत सत्ताधारी नसल्यामुळे एप्रिल महिन्यात प्रशासनाने अर्थसंकल्प तयार केला. त्यामध्ये शहर म्हणून असंख्य विकासकामांचा समावेश करण्यात आला होता. त्यातील एक किंवा दोन कामे मार्गी लागली आहेत. उर्वरित ९० टक्के कामे जशीच्या तशी आहेत. याला कारण म्हणजे महापालिकेची दयनीय आर्थिक अवस्था होय. मार्चअखेरपर्यंत महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाने निश्चित केलेली कामे होण्याची शक्यता जवळपास धूसर आहे.
नऊ महिन्यांत ११ टक्के वसुली
चालू आर्थिक वर्षात प्रशासनाने चारशे कोटी रुपये मालमत्ता करातून येतील असे गृहीत धरले होते. मागील नऊ महिन्यांमध्ये फक्त ५३ कोटी रुपये महापालिकेकडे जमा झाले आहे. पाणीपट्टी वसुली ही जेमतेम आहे. नगररचना विभागाकडून फारसे आर्थिक सहाय्य मिळायला तयार नाही. त्यामुळे दैनंदिन खर्चाचे प्रशासनाला वांधे झाले आहेत.
महापालिकेच्या स्वप्नातील विकासकामे
- ६ कोटी रुपये खर्च करून शहरातील प्रमुख सहा रस्त्यांमधील दुभाजकांचे सौंदर्यीकरण करणे.
- २५ कोटी रुपये खर्च करून शहरातील नऊ झोन कार्यालयांतर्गत रस्त्यांचे पुन्हा नव्याने डांबरीकरण.
- महावीर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ३ कोटी रुपये खर्च करून आदर्श रस्ता विकसित करणे.
- २५ लाखांचे दोन फिरते शौचालय खरेदी करणे.
- शहरात जमा होणारा कचरा रिक्षातून मोठ्या वाहनात टाकण्यासाठी ५० लाखांचे ठिकठिकाणी ट्रान्सफर स्टेशन उभारणे.
- शहराच्या चारही बाजूने प्रवेशद्वारावर १ कोटी रुपये खर्च करून स्वागत कमानी उभारणे.
- मध्यवर्ती जकात नाका येथे बहुमजली व्यापारी संकुल बांधणे.
- शहाबाजार येथील कत्तलखाना अद्ययावत करणे.
- शहराच्या वेगवेगळ्या भागात मांस विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे.
- पैठण गेट येथे बहुमजली पार्किंग विकसित करणे.
- महापालिकेच्या मालकीच्या जागेवर वेगवेगळ्या भागात पेट्रोल पंप, डिझेल पंप सुरू करणे.
- कांचनवाडी येथे महापालिकेच्या जागेवर व्यापारी संकुल आणि कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थान बांधणे.
- सिद्धार्थ उद्यान येथे अम्युझमेंट पार्क उभारणे.
- शहरात अद्ययावत दुग्धनगरी उभारणे.
- नेहरू भवन येथील नाट्यगृहाची जागा विकसित करणे.
- रोझ गार्डन येथे छोटे-छोटे गाळे उभारून विकास करणे.
- गरवारे क्रीडा संकुलात जलतरण तलावाची उभारणी करणे.