जन्मानंतर पहिल्यांदाच चिमुकली विसावली कोरोनामुक्त आईच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2020 04:53 PM2020-05-13T16:53:40+5:302020-05-13T16:59:28+5:30
कोरोनामुक्त आई आणि मुलीची अखेर भेट
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद: बायजीपुरा येथील कोरोनामुक्त आईने प्रसूतीच्या २५ दिवसांनी नवजात मुलीला अखेर बुधवारी कुशीत घेतले. जन्मानंतर पहिल्यांदाच आईने आपल्या मुलीला पहिला स्पर्श केला.
जिल्हा सामान्य रुग्णालयात गत आठवड्यात १८ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह महिलेची सिजर प्रसूती यशस्वी झाली हिती. या महिलेने मुलगी झाली. या तपासणीतून ही नवजात मुलगी कोरानामुक्त असल्याचे निदान झाले होते. मात्र, कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून मुलीला जन्मल्यानंतर आईपासून दूर ठेवले. तेव्हा डॉक्टर, परिचारिका या बाळाचा सांभाळ करीत होते. अखेर सदर महिलेचेही दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्याने या आईची आणि मुलीची भेट होण्याचाही मार्ग अखेर मोकळा झाला होता.
जिल्हा रुग्णालयात दाखल ही महिला कोरोनामुक्त झाली आणि उपचारांनंतर २९ एप्रिल रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. मात्र, खबरदारी म्हणून १४ आईला मुलीपासून दूर ठेवण्याची सूचना करण्यात आली होती. रुग्णालयातून जाताना नवजात मुलगी वडिलांकडे सुपूर्त करण्यात आली होती. तेव्हापासून घरी या मुलीचा नातेवाईकच सांभाळ करीत होते. अखेर या मातेची मुलीला कुशीत घेण्याची प्रतीक्षा बुधवारी संपली. मुलीला तिने कुशीत घेतले. हा आयुष्यातील सर्वाधिक मोठा आनंद असल्याचे या मातेने म्हटले.