पहिल्यांदाच शहरात आले अन् पगारिया शोरुम फोडून गेले, आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

By राम शिनगारे | Published: September 21, 2022 08:38 PM2022-09-21T20:38:22+5:302022-09-21T20:38:29+5:30

ही टोळी गुजरातसह महाराष्ट्रात शोरुम फोडण्याचेच गुन्हे करते.

first time came in city and stolen money in the Pagariya showroom, an inter-state criminal gang was exposed | पहिल्यांदाच शहरात आले अन् पगारिया शोरुम फोडून गेले, आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

पहिल्यांदाच शहरात आले अन् पगारिया शोरुम फोडून गेले, आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश

googlenewsNext

औरंगाबाद : वर्दळीच्या जालना रोडवरील पगारिया ॲटो शोरुम फोडून दोन तिजोऱ्यातील १५ लाख ४३ हजार २४७ रुपयांची रोकड लंपास करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. दोन राज्यातील शोरुम फोडण्यात 'एक्सपर्ट' असलेल्या टोळीच्या दोन सदस्यांनी घटनेपुर्वी सहा तास आधी शहरात येऊन शोरुमची रेकी केली. त्यानंतर इतर साथीदारांना बोलावून घेत चोरी करून आलेल्या मार्गाने निघुन गेल्याचे उघडकीस आले. या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, उर्वरित पाच जणांची नावे समोर आल्याची माहिती गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक अमाेल म्हस्के व अजित दगडखैर यांच्या पथकाने मुख्य आरोपी शिवा नागुलाल मोहिते, सोनु नागुलाल मोहिते (दोघे रा.विचवा, ता. बोधवड, जि. जळगाव) आणि अजय सिताराम चव्हाण (रा. धानोरी, ता. बोधवड, जि. जळगाव) यांना अटक केली. त्यांच्याशिवाय टोळीत जितु मंगलसिंग बेलदार, अभिषेक देवराम मोहिते (दोघे रा. धानोरी, ता. बोधवड, जि. जळगाव), बादल हिरालाल जाधव, विशाल भाऊलाल जाधव (दोघे रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) आणि करण गजेंद्र बेलदार-चव्हाण (रा. दाभेपिंप्री, ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याचा समावेश आहे.  ३ ऑगस्टच्या मध्यरात्रीनंतर या टोळीने पगारिया ॲटो शोमरुमध्ये शटर उचकटून प्रवेश करीत तिजोरीच्या खोलीच्या काचा फोडून दोन तिजाेऱ्या पळवल्या होत्या. तिसगाव शिवारात तिजोऱ्या फोडून त्यातील १५ लाख ४३ हजार रुपये काढुन घेत पोबारा केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.

ही टोळी गुजरातसह महाराष्ट्रात शोरुम फोडण्याचेच गुन्हे करते. ही टोळी शोरुम फोडण्यासाठी पुण्याला जाणार होती. मात्र, वाटेत पाऊस लागल्यामुळे रेकीसाठी आलेल्या दुचाकीवरील दोघांनी ३ ऑगस्ट रोजी पाच वाजता पगारिया शोरुमची पाहणी केली. त्यानंतर इतर साथीदारांना जळगावहुन बोलावून घेतले. रात्री पोहचलेल्या आरोपींनी जळगाव रोडने आल्यानंतर त्यांनी चिकलठाण्यात जेवण केले. तेथून बीड बायपासला येऊन बाबा पेट्रोल पंपावर मध्यरात्री १२ वाजून ४९ मिनिटाला पोहचले. तेथून पगारियात येत तिजोरी फोडून पावणे दोन वाजता चोरटे बाहेर पडले. तीन दुचाकीवर तिजोऱ्यांसह सर्वजण गाडीवर बसत नसल्यामुळे त्यातील दोघेजण पायी चालत बाबा पेट्रोल पंपापर्यंत गेले. तोपर्यंत इतरांनी तिसगाव शिवारात तिजोऱ्या नेऊन फोडल्या. चालत येणाऱ्या घेण्यासाठी एकजण आला. तिजोऱ्या फोडल्यानंतर त्यातील पैसे घेऊन चोरटे परत बाबा पेट्रोल पंप चौकात आले. तेथून दिल्ली गेट फुलंब्री मार्गे जळगावच्या दिशेने गेलेल्याचे सीसीटीव्हीतुन स्पष्ट झाले. 

कुणी गाडी घेतली तर, कुणी म्हशींची खरेदी
चोरट्यांना १५ लाख ४३ हजार रुपयांची रोकड मिळाली होती. त्यात एकाने चारचाकी गाडी घेतली. एकाने चार म्हशींची खरेदी केली, तर एकाने घर बांधण्यात काढले. एका चोरट्याने फ्लॅटच्या खरेदी केल्याचेही चौकशीत समोर आले आहे.

सख्खे भाऊ टोळीचे म्होरके
पोलिसांनी पकडलेले साेनु मोहिते व शिवा मोहिते हे सख्खे भाऊ ही टोळी चालवत होते. टोळीतील सर्व सदस्य हे आपसात नातेवाईक आहेत. सोनु व शिवा या दोघांवर गुजारातमध्ये शोरुम फोडीचे आठ गुन्हे दाखल आहेत. तर महाराष्ट्रात ७ गुन्ह्यांची नोंद आहे. त्याशिवाय इतर २७ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे.

साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे शाखेने तीन आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन दुचाकी, चोरीच्या पैशातुन घेतलेले दोन तोळे सोने आणि रोख १ लाख रुपये असा एकुण ४ लाख २८ हजा रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बांगड्या विकण्याचा व्यवसाय
आरोपींचा माग काढत गुन्हे शाखेचे पथक बोधवड तालुक्यातील विचवा येथे पोहचले. त्याठिकाणी १०० पेक्षा अधिक झोपड्यांमध्ये आरोपी राहत होते. त्यांचा शोध घेणे कठिण असताना बांगड्या विकण्यासाठी बाहेर पडलेल्या तिघांना पकडले. त्यासाठी तीन दिवस पाहणी करावी लागली. 

यांनी केली कामगिरी

गुन्हा घडल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी शोरुम फोडणाऱ्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. यासाठी निरीक्षक अविनाश आघाव, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, सहायक फौजदार रमाकांत पटारे, सतीश जाधव, हवालदार संजय राजपुत, नवनाथ खांडेकर, संदीप तायडे, संजय नंद, विठ्ठल सुरे, सुनील बेलकर, संदीप राशिनकर, नितीन देशमुख, काकासाहेब अधाने, अजय दहिवाल, विजय घुगे, धनंजय सानप, संजिवनी शिंदे, पुनम पारधी, आरती कुसळे यांनी सहभाग नोंदवला.

Web Title: first time came in city and stolen money in the Pagariya showroom, an inter-state criminal gang was exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.