जुलैच्या सुरुवातीला पहिल्यांदा जायकवाडीत ४० टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 07:45 PM2020-07-13T19:45:13+5:302020-07-13T19:50:02+5:30
सर्वाधिक वेळा दरवाजांचे ऑपरेशन होण्याचा योग आला २०१९ च्या पावसाळ्यात
- विकास राऊत
औरंगाबाद : येथील उद्योग, व्यापार आणि सामान्यजणांची जीवनवाहिनी असलेल्या नाथसागरात (जायकवाडी धरण) यंदा मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच जुलैच्या सुरुवातीला ४० टक्के जिवंत जलसाठा आहे.
गेल्या वर्षी खरीप आणि रबी हंमागाची सात आवर्तने देऊनही धरणात जिवंत साठ्याचे प्रमाण मोठे आहे. जायकवाडी धरणाला बांधून ४४ वर्षांचा काळ लोटला आहे. या काळात सर्वाधिक वेळा दरवाजांचे आॅपरेशन होण्याचा योग २०१९ च्या पावसाळ्यात आला. धरण १०० टक्के भरल्यानंतर अंदाजे ५५ ते ६० टीएमसी पाण्याचा विसर्ग गेल्यावर्षी करण्यात आला. उन्हाळ्यात खरीप हंगामासाठी ४ आवर्तने (पाणी सोडणे) देण्यात आली. रबी हंगामासाठी ३ आवर्तने देण्यात आली. गेल्या पावसाळ्यात धरणात एकूण क्षमतेच्या तुलनेत दीडपट पाणी आले. त्यातून पाण्याचा विसर्ग नियमित होत राहिला. परभणी जिल्ह्यातील शाखा कालवा येथून २०८ कि.मी. अंतरावर असून, तिथपर्यंत धरणातून पाणी सोडण्यात आले.
२०१६ साली धरण होते मृतसाठ्यात
जायकवाडी धरणात २०१५ साली ५६ दलघमी पाणी होते. २०१६ साली धरण मृतसाठ्यात गेले होते. २०१७ साली ४१९, तर २०१८ साली ४८९ दलघमी पाणी होते. २०१९ साली २१७१ दलघमी पाणी असल्याने धरण १०० टक्के भरले होते, तसेच अंदाजे १,०५० दलघमी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. सध्या धरणात १,६११ दलघमीच्या आसपास पाणीसाठा आहे. गेल्या पावसाळ्यात जायकवाडी धरणाचे दरवाजे ४६ दिवस खुले करण्यात आले. धरणाला एकूण २७ दरवाजे असून, १ ते ९ क्रमांकाचे दरवाजे उघडलेले नव्हते. १० ते २७ क्रमांकांपर्यंतचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते. धरणांच्या ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड पहिल्यांदाच झाला आहे. आजवर ५ ते १० वेळा ‘गेट आॅपरेशन’चा रेकॉर्ड आहे. १०० अधिक वेळा ‘गेट आॅपरेशन’ मागच्या पावसाळ्यात झाले
पाच वर्षांत पहिल्यांदाच झाला ४० टक्के पाऊस
देशभर कोरोनाच्या नियंत्रणासाठी यंत्रणा काम करीत असताना पावसाने मात्र यंदा सुखकारी आगमन केले आहे. पाच वर्षांत पहिल्यांदाच जून महिन्यात जिल्ह्यांत सुमारे ४० टक्के पाऊस बरसला. यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यांतम १९ दिवस पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. १ जूनपासून औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १९ दिवस पाऊस झाल्याची नोंद आहे. परिणामी, ६५ टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. १ जून ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये ६७५.४४ मिलीमीटर पाऊस विभागात होणे अपेक्षित असून, ३० जूनपर्यंत जिल्ह्यात सरासरी २७१.४५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
पाच वर्षांतील लघु व मध्यम
प्रकल्पांची स्थिती : जिल्ह्यात १६ मध्यम आणि ९३ लघुप्रकल्प आहेत. यामध्ये ३९३ दलघमी पाणी साठवण क्षमता आहे. १६ मध्यम प्रकल्प मागील पाचपैकी तीन वर्षे २०१५ ते २०१८ पर्यंत मृतसाठ्यात होते. २०१९ साली या प्रकल्पांत ५० टक्क्यांपर्यंत पाणी आले. काही प्रकल्प भरले. सद्य:स्थितीत या प्रकल्पांमध्ये २० टक्के पाणी आहे. लघु प्रकल्पांत २०१५ ते २०१७ शून्य टक्के पाणी होते. २०१७ साली ४ टक्के, तर २०१८ साली ७ टक्के पाणी होते. २०१९ साली दीड टक्का, तर २०२० सालच्या जूनपर्यंत १३ टक्के पाणी लघु प्रकल्पांत आहे.