कोरोनाची पहिली लाट ज्येष्ठांच्या, तर दुसरी लाट तरुणांच्या जीवावर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:02 AM2021-06-06T04:02:06+5:302021-06-06T04:02:06+5:30
औरंगाबाद : औरंगाबादकर गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या महाभयंकर महामारीविरुद्ध लढा देत आहेत. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला म्हणजे पहिल्या ...
औरंगाबाद : औरंगाबादकर गेल्या १४ महिन्यांपासून कोरोनाच्या महाभयंकर महामारीविरुद्ध लढा देत आहेत. गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला म्हणजे पहिल्या लाटेत तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक राहिले. त्यामुळे कोरोनाचा सर्वाधिक धोका हा ज्येष्ठांना असल्याचे सांगितले जात होते. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गेली ३ महिने कहर केला. कोरोनाची ही दुसरी लाट ज्येष्ठांपाठोपाठ तरुणांच्या जीवावर उठली. अवघ्या तिशीतील तरुणांचे बळी गेले. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हादरून गेली, हतबल झाली. गेल्या ३ महिन्यांत औरंगाबादेत कधीही न पाहिलेली अशी महामारीची स्थिती बघायला मिळाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दिलासा व्यक्त होत आहे. जनजीवन सुरळीत होत आहे. पण पुढे तिसऱ्या लाटेचे संकट उभे राहण्याची भीतीही आहे. त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज होत आहे.
------
खबरदारी महत्त्वाची
आवश्यक ती खबरदारी घेतली, गर्दी टाळली, मास्कचा वापर केला तर तिसऱ्या लाटेचा धोका कमी होईल. लहान मुले घराबाहेर पडण्याचे प्रमाण कमी आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ, दुसऱ्या लाटेत मध्यम वयातील लोकांना कोरोना होण्याचे प्रमाण अधिक राहिले. आता त्यांचे लसीकरणही सुरू आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेत मुलांना कोरोना होण्याची शक्यता आहे.
- डाॅ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
तिसरी लाट?
-सप्टेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालकांना अधिक धोका असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तविली जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकडून आतापासूनच खबरदारी घेणे सुरू आहे.
- एकूण कोरोना रुग्णांत पहिल्या लाटेत २ ते ३ टक्के आणि दुसऱ्या लाटेत ७ ते ८ टक्के मुलांचे प्रमाण राहिले. तिसऱ्या लाटेत हे प्रमाण १२ ते १५ टक्के राहण्याची शक्यता आहे.
- तिसऱ्या लाटेत ९० टक्के बालकांना लक्षणे नसल्याची आणि सौम्य लक्षणे असल्याचा अंदाज आहे.
- केवळ १० टक्के बालकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटरची गरज पडू शकते, असे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी म्हणाले.
----------
कोरोना पाॅझिटिव्ह (वयोगटानुसार)
वयोगट- पहिली लाट- दुसरी लाट
० ते ५- ६३३ -७५८
५ ते १८ - ३८९६ - ३८९९
१८ ते ५० - १९,४८३- ३३,१८२
५० वर्षांवरील- ९,९३४ - १४,५८३
------
कोरोना मृत्यू
काय म्हणते आकडेवारी...(शहरातील)
वयोगट - पहिली लाट- दुसरी लाट
० ते १५- २ - ३
१६ ते ३०- १४ - १९
३१ ते ४५ - ८९ - १०७
४६ ते ६० - २४० -२८०
६१ ते ७५ - ३५७ -४२६
७६ ते ९० - १२० - १८८
९० ते १०० - ७ -७
--------
एकूण महिला- ३३,२४६
एकूण महिला मृत्यू- ६२०
---