आधी आम्ही ५० होतो, नंतर भाजपचे १०५ येऊन मिळाले; येत्या विधानसभेत २०० निवडून आणू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 12:10 PM2022-08-01T12:10:21+5:302022-08-01T12:11:24+5:30
शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला.
औरंगाबाद : आधी आम्ही ५० होतो, नंतर १०५ येऊन मिळाले, आगामी विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपच्या २०० जागा निवडून आणू, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.
आ. प्रदीप जैस्वाल यांच्या नारळीबाग येथील संपर्क कार्यालयाास सदिच्छा भेट दिल्यानंतर उपस्थितांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर आ. जैस्वाल, आ. संजय सिरसाट, आ. संदीपान भुमरे, आ. अतुल सावे, आ. नारायण कुचे यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर काम करत आहोत. आम्ही घेतलेल्या भूमिकेचे स्वागत राज्यातील जनता करत आहे. मला आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यासाठी रात्री ३ वाजेपर्यंत मालेगावातील नागरिक रस्त्यावर उभे होते. तुमचेही प्रेम तेवढेच असल्याचे या गर्दीवरून दिसते. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघाचे पालकत्व मी स्वीकारले आहे. विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. शहरातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी ७०० मी.मी. व्यासाची नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी २०० कोटी रुपये मंजूर केल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले. लेबर कॉलनीतील रहिवाशांचा प्रश्न सोडविणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार
जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी क्रांतीचौकात मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. रात्री ११.२० मुख्यमंत्री तेथे पोहोचले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिवसेना-भाजपचे सरकारला तुमचा पाठिंबा आहे का ? अशी विचारणा उपस्थित जनसागराला केली. तरुणाईने हात वर करून होकार दिला. सारथी, बार्टी आणि महाज्योती संस्थेचे प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ओबीसीच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.