खात्यावरून आधी केली हेटाळणी, आता सर्वच करतात निधीची मागणी : संदीपान भुमरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 07:22 PM2021-11-30T19:22:42+5:302021-11-30T19:23:58+5:30
Sandipan Bhumare : आतापर्यंत या खात्याला कोणी विचार नव्हते; आता विविध योजना आणि निधीमुळे आले महत्व
खुलताबाद ( औरंगाबाद ) : खातेवाटपात रोहयो व फलोत्पादन मंत्रिपद मिळाल्याने, साधे खाते मिळाल्याची चर्चा अनेकजण करत होते. मात्र, कोरोना काळात सगळ्या मंत्र्याच्या खात्यांचा निधी कपात करण्यात आला, पण माझ्या खात्याचा झाला नाही. आज सर्वच मंत्री व आमदार माझ्याकडे निधीची मागणी करत आहेत, असा टोला रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी हेटाळणी करणाऱ्यांना लगावला. आतापर्यंत कुणी या खात्याला विचारत नव्हते, पंरतु अनेक नवीन योजना शेतकरी, मजूरासाठी तसेच वैयक्तिक लाभाच्या योजना आल्याने या खात्याचे महत्व वाढले आहे. आता या खात्याच्या माध्यमातूनच ग्रामीण भागाचा विकास साधणार असल्याची ग्वाही मंत्री संदीपान भुमरे यांनी दिली.
खुलताबाद येथे मातोश्री ग्रामसमृध्दी योजनेची आढावा बैठक रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. बैठकीस आ. प्रशांत बंब, आ. अंबादास दानवे, जि. प. उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, जि. प. सदस्य सुरेश सोनवणे, भीमराव खंडागळे, तालुका प्रमुख राजू वरकड, सभापती गणेश आधाने, उपसभापती युवराज ठेंगडे, मंदार वैद्य, सुदर्शन तुपे, जनार्दन विधाते, तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी प्रविण सुरडकर आदीसह सरपंच, ग्रामसेवक व विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांनी रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे म्हणाले की, रोहयो अंतर्गत असणा-या कामाचा प्रत्येक तालुकास्तरावर आढावा घेण्यात येणार असून सर्वच ठिकाणाहून रस्त्याच्या कामासाठी मागणी येत आहे. शेतीचे रस्ते पूर्ण झाले तर शेतीचा व गावाचा विकास होईल. ग्रामीण भागात रस्ते करायचे असतील तर रोहयो शिवाय पर्याय नाही. एक कि. मी. खडीकरण कामासाठी २४ लाख रूपये देण्यात येणार असून रोहयोची कामे करत असतांनी अधिकारी व कर्मचारी यांनी कुठलीही भीती बाळगू नये, रस्त्याच्या कामात अकुशल कामे व्यवस्थित करा त्यामुळे मजूराला काम व शेतीला रस्ता मिळेल. तालुक्यात किमान एक हजार किमीचे रस्ते व्हायला हवेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच रोहयोच्या कामात खुलताबाद तालुका मागे असल्याची खंत त्यांनी यावेळी बोलून दाखविली. पाणंद रस्त्याच्या कामासाठी गावातून जास्तीत जास्त कामे सादर करून रस्त्याची कामे करून घ्यावी, यासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे ही मंत्री भुमरे स्पष्ट केले.