‘फिट है बॅास...स्टाईल में रहने का...’ काळ्या जाकीटमध्ये ते फिरताहेत ऐटीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 02:12 PM2020-12-18T14:12:16+5:302020-12-18T14:17:27+5:30

Pet Lovers, Dog Walk in Aurangabad पूर्वी रस्त्यावर माती असे. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून कुत्रे माती उकरून त्या छोट्याशा खड्ड्यात बसून ऊब मिळवत असत.

‘Fit hai Boss ... stay in style ...’ Dogs are walking around in a black jacket | ‘फिट है बॅास...स्टाईल में रहने का...’ काळ्या जाकीटमध्ये ते फिरताहेत ऐटीत

‘फिट है बॅास...स्टाईल में रहने का...’ काळ्या जाकीटमध्ये ते फिरताहेत ऐटीत

googlenewsNext
ठळक मुद्देपेट लव्हर्स असोसिएशनचा उपक्रम शहरातील नागरिकांच्या वळताहेत नजरा...

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : थंडीपासून बचाव करण्यासाठी त्यांनी काळ्या रंगाचे जाकीट अंगावर चढवले आहे.  त्यांच्या पिवळ्या रंगावर पांढरी किनार असलेले जाकीट चांगलेच शोभून दिसत आहेत. गळ्यात रेशमी रुमाल किंवा मफलर टाइप पट्टाही बांधला आहे. हे जाकीट घालून ते एकमेकांकडे बघत ‘फीट है बॉसऽऽऽ’ अशा आविर्भावात ऐटीत चालत आहेत. त्यांची ही ऐट पाहून नागरिकांच्या नजराही त्यांच्याकडे वळत आहेत. 

ही स्टाइलबाज मंडळी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून, शहरातील भटकी कुत्री आहेत. शहरातील पेट लव्हर्स असोसिएशनने थंडीपासून बचाव होण्यासाठी शहरातील भटक्या कुत्र्यांना जाकीट घालण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे काळे जाकीट घातलेली कुत्री शहरात काही ठिकाणी निदर्शनास येत आहेत. पूर्वी रस्त्यावर माती असे. हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून कुत्रे माती उकरून त्या छोट्याशा खड्ड्यात बसून ऊब मिळवत असत. मात्र, आता शहरात गल्लीबोळांमध्येही पेव्हर ब्लॉकचे आणि सिमेंटचे रस्ते होऊ लागले आहेत.  कुत्र्यांनाही थंडी वाजते. त्यांना सिमेंट उकरून काढता येत नाही. अशा वेळी रात्री थंडीत भटके कुत्रे कुडकुडत असतात.  हे लक्षात घेऊन पेट लव्हर्स असोसिएशनने खास जाकीट शिवून घेतली आहेत. विशेषत: भटक्या कुत्रांना ती जाकीट व गळ्यातील पट्टे घातले जात आहेत. सर्व काम मोफत केले जात आहे. स्मार्ट सिटीसोबत प्राण्यांनीही स्मार्ट दिसावे यासाठी शहरात हे अभियान सुरू झाले आहे.

एन-१, एन-४ सिडको, गारखेडा, नाथप्रांगण, गादियाविहार, मुकुंदवाडी या परिसरात काही भटक्या कुत्र्यांना रेक्झिनपासून तयार करण्यात आलेले जाकीट घालण्यात आल्याचे दिसून आले. एन-४ सिडको येथील एफ-सेक्टरमधील रहिवासी मीरा सातपुते या तरुणीने सांगितले की, पेट लव्हर्स असोसिएशनकडून तिला परिसरातील भटक्या कुत्र्यांना घालण्यासाठी बेल्ट व जाकीट मिळाले. तिने ७ कुत्र्यांना ते बेल्ट व जाकीट घातले. पहिल्या दिवशी कुत्र्यांनी ते जाकीट उड्या मारून व लोळून काढून टाकले; पण दुसऱ्या दिवसापासून कुत्र्यांनी जाकीट घालणे सुरू केले. काही वेळाने कुत्रे लोळून जाकीट काढून टाकत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना दिवसातून तीन ते चार वेळा जाकीट घालावे लागते. यासाठी परिसरातील बच्चेकंपनी मदत करतात. कुठे रस्त्यात जाकीट पडलेले असेल, तर लहान मुले ते आणून देतात. रात्रीच्या वेळी मात्र थंडीपासून बचाव होत असल्यामुळे जाकीट घालूनच कुत्री झोपी जात आहेत. मुकुंदवाडी परिसरात एक आजी परिसरातील ५ ते ६ कुत्र्यांना दररोज असे जाकीट घालते. गादियाविहार परिसरातील किशोर बागूल व त्यांचे सहकारी परिसरातील ८ ते १० कुत्र्यांना दररोज जाकीट घालतात. एन-१ सिडको येथील हर्ष चेके यांनी सांगितले की, परिसरातील भटक्या कुत्र्यांना मी रात्री जाकीट घालतो. कारण त्यांना रात्री उशिरा व पहाटेच्या वेळी खूप थंडी वाजत असते. उबदार कपड्यांमुळे त्यांना थंडीपासून बचाव करण्यास मदत होते.  

आता लाल जाकीट देणार 
रात्री अंधारात कुत्रे दिसावे यासाठी  रेडियमचा वापर केलेले १ हजार बेल्ट तयार केले आहेत. त्यातील ८०० बेल्ट मनपाला देण्यात आले व आमची संघटना मिळून शहरातील १ हजार भटक्या कुत्र्यांना बेल्ट बांधत आहे, तसेच सध्या काळ्या रंगाची १०० जाकीट तयार करण्यात आली व आता  नवीन १० लाल कपड्यांचे जाकीट‌‌ तयार करून घेत आहोत. नागरिकांनी त्यांच्या परिसरातील पाळीव व  भटक्या कुत्रांना ही घालावीत.
- बेरील सेंचीस, अध्यक्षा, पेट लव्हर्स असोसिएशन, औरंगाबाद

Web Title: ‘Fit hai Boss ... stay in style ...’ Dogs are walking around in a black jacket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.