हज यात्रेतील महत्त्वाचे पाच दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 01:08 AM2018-05-28T01:08:10+5:302018-05-28T01:08:49+5:30
हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : हज यात्रेदरम्यान महत्त्वाचे पाच दिवस कोणते. या पाच दिवसांमध्ये कोणते विधी भाविकांना पार पाडावे लागतात, याची इत्थंभूत माहिती रविवारी मराठवाड्यातील यात्रेकरूंना देण्यात आली. जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे तिसरे प्रशिक्षण शिबीर उत्साहात पार पडले.
सकाळी नऊ वाजता प्रशिक्षण शिबिराला सुरुवात झाली. जामा मशीदचे इमाम जाकेर साहब यांनी पवित्र कुराण पठण केले. डॉ. हाफीज नरूल फैसल यांनी नात सादर केली. शिबिराच्या पहिल्या सत्रात मरकज-ए-खिदमात-ए-हुज्जाज कमिटीचे मौलाना नसीमउद्दीन मुफ्ती यांनी हज यात्रेतील पाच दिवस या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, हज यात्रा फर्ज असून, इबादत समजून भाविकांनी ती पूर्ण करायला हवी. शिबिराच्या दुसऱ्या सत्रात प्रा. शेख अब्दुल खालेक यांनी हज यात्रेतील प्रमुख पाच दिवस कशासाठी महत्त्वाचे आहेत, यावर सविस्तर विवेचन केले. हज यात्रेसाठी तयारी कशी करावी, विधी कोणते महत्त्वाचे आहेत. हज यात्रेत कोणती इबादत करावी, दुआ आदी विषयांवर त्यांनी भाविकांना साध्या सरळ आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
हज यात्रेतील महत्त्वाची बाब म्हणजे ‘उमरा’होय. उमरा कशा पद्धतीने करावे यावरही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. हज यात्रेत वस्त्र फक्त अहेराम धारण करावे लागते. ते कशा पद्धतीने घालावे याचीही माहिती देण्यात आली. सायंकाळी ४ वाजता शिबिराचा समारोप करण्यात आला. मराठवाड्यातील तब्बल १४०० पेक्षा अधिक भाविकांनी यात सहभाग घेतला.