पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

By विकास राऊत | Published: January 6, 2024 01:15 PM2024-01-06T13:15:11+5:302024-01-06T13:20:01+5:30

८७० पैकी ४४ ग्रामपंचायतींनी वाढविला उत्तम निर्देशांक

Five gram panchayats will participate in the panchayat development index competition | पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

पंचायत विकास निर्देशांक स्पर्धेत उतरणार पाच ग्रामपंचायती

छत्रपती संभाजीनगर : गावांच्या शाश्वत विकासासाठी विविध कल्याणकारी योजना हाती घेण्यात आल्या असून, केवळ योजनाच नाही, तर ग्रामपंचायतस्तरावर आरोग्य, सार्वजनिक सुविधा, महिलांची प्रगती, शिक्षण तसेच कचरा आणि सांडपाण्याचे उत्तम नियोजन यावर मागील काही महिन्यांपासून सर्वच काम केले जात आहे. आता याच कामांवर पंचायत विकास निर्देशांक ठरणार असून, एप्रिलमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत ४४ पैकी जिल्ह्यातील उत्कृष्ट निर्देशांक असलेल्या ५ ग्रामपंचायती सहभागी करण्याचा जिल्हा परिषदेचा प्रयत्न आहे.

केंद्र शासनाने गावांची समृद्धी वाढविण्यासाठी तिथे शाश्वत विकासाच्या कामांवर भर देण्याचे निर्देश दिले आहेत. या माध्यमातून नऊसुत्री कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गरिबीमुक्त गाव, आरोग्यदायी गाव, बाल-स्नेही गाव, जलसमृद्ध गाव, स्वच्छ हरित गाव, पायाभूत सुविधांनी युक्त गाव, सामाजिक न्याय व सामाजिकदृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासनयुक्त गाव, महिलास्नेही गाव आदींचा समावेश असणार आहे. यावरच ग्रामपंचायतींचा ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) ठरणार आहे.

सन २०२२ - २३ मधील माहितीच्या आधारावर हा निर्देशांक तयार करण्यात येणार आहे. या निर्देशांकामध्ये ग्रामपंचायत विकासाच्या कमकुवत बाबी व बलस्थाने निश्चित होणार आहेत. या माध्यमातून निर्माण होणारा माहिती संग्रह जिल्हा, राज्य व केंद्र पातळीवर विकास नियोजन प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार आहे. या निर्देशांकाचा उपयोग ग्रामपंचायतींना कोणती कामे तसेच कोणते उपक्रम राबवायचे आहेत, यासाठी दिशादर्शक म्हणून उपयोगात येणार असून, सन २०२३- २४ मध्ये तयार होणारा हा निर्देशांक बेसलाइन इन्फॉर्मेशन म्हणून वापरला जाणार आहे.

विकासाची स्पर्धा असावी
जिल्ह्यात विकासकामे राबविली जात आहेतच. पण, गावागावात विकासाची स्पर्धा झाली पाहिजे. म्हणूनच केंद्र शासनाने ‘पंचायत विकास निर्देशांक’ (पीडीआय) निश्चित करून राज्य व राष्ट्रीय स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जिल्ह्यातील ४४ ग्रामपंचायतींचा विकास निर्देशांक चांगला आहे. तरीही अत्युत्तम निर्देशांक असणाऱ्या ५ ग्रामपंचायती राज्य स्पर्धेत सहभागी करण्याचा आपला विचार आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी सांगितले.

Web Title: Five gram panchayats will participate in the panchayat development index competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.