शहरात पाचशे ऑक्सिजन बेड्स रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:05 AM2021-04-23T04:05:41+5:302021-04-23T04:05:41+5:30
औरंगाबाद : शहरात कोविड केअर सेंटर व दवाखान्यांचे मिळून सुमारे पाचशे ऑक्सिजन बेड्स रिक्त आहेत, तर कोविड केअर सेंटरमधील ...
औरंगाबाद : शहरात कोविड केअर सेंटर व दवाखान्यांचे मिळून सुमारे पाचशे ऑक्सिजन बेड्स रिक्त आहेत, तर कोविड केअर सेंटरमधील जवळपास दोन हजार खाटा रिकाम्या असल्याचा दावा महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केला.
पाण्डेय म्हणाले, शहरात सध्या व्हेंटिलेटर्स आणि आयसीयू बेड्सची मागणी जास्त आहे. त्या तुलनेत ऑक्सिजन बेड रिकामे आहेत. चारशे ते पाचशे ऑक्सिजन बेड सध्याच्या स्थितीत रिकामे आहेत. विविध कोविड केअर सेंटरमध्ये एकूण तीन हजार खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यापैकी १७०० खाटांवर रुग्ण आहेत, उर्वरित खाटा रिकाम्या आहेत. एमजीएम रुग्णालयाला ऑक्सिजन बेड्स वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय या रुग्णालयाला जिल्हा टास्क फोर्सच्या माध्यमातून शंभर व्हेंटिलेटर्सदेखील उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यापैकी पाच व्हेंटिलेटर्स पालिकेने दिले आहेत. एमजीएम रुग्णालय रुग्णांकडून व्हेंटिलेटरचे शुल्क आकारणार नाही, अन्य उपचार आणि औषधींचे शुल्क मात्र आकारले जाईल, असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले.
तिसरी लाट डिसेंबर अखेरीस
शहरात डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. मात्र, किमान ४० टक्के नागरिकांना लसीकरण झाल्यास या लाटेचा परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. गतवर्षी कोरोना लाटेत जास्त चाचण्या करून कोरोना संसर्गाला थोपविले होते. यावेळी लसीकरणावर भर देण्यात आला आहे. जास्तीत नागरिकांमध्ये अँटिबॉडिज तयार झाल्यानंतर तिसऱ्या लाटेचा परिणाम होणार नाही.