बेडच्या शोधात दिवसभर फिरले बजाजनगरातील पाच बाधित रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:03 AM2021-03-18T04:03:26+5:302021-03-18T04:03:26+5:30

वाळूज महानगर : शहर व परिसरातील सर्वच रुग्णालयांतील बेड हाऊसफुल्ल झाले असून, कोरोनाबाधित रुग्णांना जागाच मिळत नसल्याची ...

Five infected patients from Bajajnagar wandered all day in search of beds | बेडच्या शोधात दिवसभर फिरले बजाजनगरातील पाच बाधित रुग्ण

बेडच्या शोधात दिवसभर फिरले बजाजनगरातील पाच बाधित रुग्ण

googlenewsNext

वाळूज महानगर : शहर व परिसरातील सर्वच रुग्णालयांतील बेड हाऊसफुल्ल झाले असून, कोरोनाबाधित रुग्णांना जागाच मिळत नसल्याची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. बजाजनगरातून बुधवारी (दि. १७) जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविलेल्या पाच रुग्णांना बेड शिल्लक नसल्याचे कारण दाखवत परत पाठविण्यात आले. तेथून प्रशासनाने त्यांना दुसऱ्या कोविड सेंटरवर पाठविले, तेथेही जागा नव्हती. त्यामुळे रुग्ण पुन्हा परत उपकेंद्रावर गेले. शेवटी सायंकाळी त्यांना भालगावच्या कोविड उपचार केंद्रात भरती करण्यात आले. रुग्णांचा संपूर्ण दिवस इकडून तिकडे पळण्यात गेला.

बजाजनगरच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात बुधवारी बजाजनगर परिसरातील चार व सिडको परिसरातील एकजण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत दाते व वैद्यकीय अधिकारी डॉ. संग्राम बामणे यांनी रुग्णांना उपचारासाठी चिकलठाण येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात बसमधून पाठवून दिले. मात्र, जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांनी बेड शिल्लक नसल्याचे सांगून त्या रुग्णांना बसमधून परत पाठविले. यानंतर बजाजनगरच्या उपकेंद्रातील डॉक्टरांनी या रुग्णांना बजाज कंपनीलगतच्या आयसीएम कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठविले. मात्र, तेथेही या रुग्णांना भरती न केल्यामुळे सायंकाळी हे रुग्ण परत बजाजनगरच्या उपकेंद्रात आले. सकाळपासून या कोरोनाबाधित रुग्णांची परवड सुरू असल्याने माजी ग्रामपंचायत सदस्या मंदा गाडेकर, सुरेश गाडेकर यांनी उपकेंद्र गाठून या रुग्णांना दाखल करून घेण्याचा आग्रह धरला होता. सरपंच सचिन गरड यांनीही डॉ. संग्राम बामणे यांच्याशी संपर्क करून या रुग्णांची परवड होऊ देऊ नका, असे बजावले होते.

आरोग्य विभागाची टोलवा-टोलवी

बजाजनगर परिसरात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. गत दीड महिन्यात या परिसरात ५८९ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. बजाजनगरातील कामगार कल्याण केंद्रातील कोविड सेंटरमध्ये ८८, तर बजाज विहार कोविड सेंटरमध्ये १५४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बुधवारी आयसीएम कोविड सेंटरमध्ये बजाजनगर परिसरातील ३५ रुग्णांना उपचारासाठी भरती करण्यात आल्याचे डॉ. संग्राम बामणे यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालयात परत पाठविलेल्या पाच पैकी चार रुग्णांना शिवा ट्रस्ट येथील कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी रवाना करण्यात आले. एका महिला रुग्णाला नातेवाइकांनी पंढरपुरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. आरोग्य विभागाच्या या टोलवा-टोलवीमुळे कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असून, नातेवाइकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

----------------------------

Web Title: Five infected patients from Bajajnagar wandered all day in search of beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.