सिल्लोड तालुक्यातील पाच मध्यम प्रकल्प जोत्याखाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:04 AM2021-07-30T04:04:51+5:302021-07-30T04:04:51+5:30
सिल्लोड : तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३३१ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्व पाऊस रिमझिम व शेतीसाठी उपयोगी झाला असला तरी ...
सिल्लोड : तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३३१ मि.मी. पाऊस झाला आहे. सर्व पाऊस रिमझिम व शेतीसाठी उपयोगी झाला असला तरी मोठा पाऊस अद्यापपर्यंत झाला नाही. त्यामुळे तालुक्यातील आठ प्रकल्पांपैकी पाच प्रकल्पांचा पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे, तर तीन प्रकल्पांमध्ये अल्प पाणीसाठा आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्रात हाहाकार घातलेल्या पावसाची दुसरीकडे शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत.
सिल्लोड तालुक्यातील अनेक विहिरींनी जुलैअखेर तळ गाठल्याने मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. एकीकडे मिरचीचे भाव कमी झाले आहेत, तर दुसरीकडे मिरचीला पाणी कमी पडत आहे. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. सिल्लोड शहरासह दहा-पंधरा गावांचा पाणीपुरवठा अवलंबून असलेल्या खेळणा प्रकल्पात अवघा २.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे मोठा पाऊस झाला नाही तर भविष्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जोरदार पाऊस झाल्यास विहिरींची पाणी पातळी वाढेल या आशेने शेतकरी वरुणराजाकडे डोळे लावून बसला आहे.
रोहिणीपाठोपाठ मृग नक्षत्रात तालुक्यात चांगला पाऊस झाला. पूर्णा नदीसह ग्रामीणमधील काही नदी-नाल्यांना पूरही आला. या पावसाने ग्रामीण भागातील छोट्या-मोठ्या जलसाठ्यांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे. तरी तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत अजून म्हणावा तसा पाणीसाठा झाला नाही.
पावसाची वार्षिक सरासरी ६५० मि.मी. आहे. आजपावेतो तालुक्यात सरासरी ३५४.८० मि.मी. पाऊस झाल्याची नोंद महसूल विभागाकडे आहे. सलग गेल्या दोन वर्षांपासून पावसाच्या मेहेरबानीमुळे तालुक्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो होत असल्याने पाणीटंचाई भासली नाही. २०१८- २०१९ मध्ये तालुक्याला भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागले होते.
----
या प्रकल्पात उपलब्ध असलेला पाणीसाठा
केळगाव लघु प्रकल्प, उंडणगाव, रहिमाबाद, हळदा-जळकी, चारनेर- पेंडगाव असे आहे. निल्लोड मध्यम प्रकल्पात ३.८९ टक्के, खेळणा मध्यम प्रकल्प - २.१६ टक्के, अजिंठा-अंधारी मध्यम प्रकल्प - ६.३९ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
----
सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत झालेला पाऊस
सिल्लोड ४११ मि.मी., भराडी ५४२ मिमी., अंभई २८८ मिमी, अजिंठा २०७ मिमी., गोळेगाव २९२ मिमी., आमठाणा ३४१ मिमी., निल्लोड ३३३ मिमी, बोरगाव बाजार ४३१ मिमी., असा एकूण सरासरी ३५४.८० मिमी. पाऊस तालुकाभरात झाला आहे.
(तलावाचा संग्रहित फोटो वापरावा)
----