मराठवाड्याच्या वाट्याला ७ मंत्रीपदे, खातीही चांगली, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:18 PM2020-01-06T18:18:38+5:302020-01-06T18:23:36+5:30

मंत्र्यांकडे काम करण्यासाठी मोठी संधी असलेली खाती

Five ministers, accounts are good for sharing of Marathwada, but ... | मराठवाड्याच्या वाट्याला ७ मंत्रीपदे, खातीही चांगली, पण...

मराठवाड्याच्या वाट्याला ७ मंत्रीपदे, खातीही चांगली, पण...

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदे मराठवाड्याला रोहयोची फार गरज विलासरावांच्या दूरदृष्टीची गरज

- स.सो. खंडाळकर

औरंगाबाद : महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मराठवाड्याच्या वाट्याला सात मंत्रीपदे आली आहेत. त्यांच्या खात्यांवर नजर टाकली, तर तशी ती फार मलईदार वगैरे नसली तरी चांगलीच आहेत. काम करण्यासाठी मोठी संधी असलेली ही खाती आहेत. 

नांदेडचे अशोकराव चव्हाण यांना काँग्रेसच्या कोट्यातून सार्वजनिक बांधकाममंत्रीपद मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदाचा अनुभव असलेले व मराठवाड्याचे मोठे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सार्वजनिक बांधकाम खाते नेहमीच मलईदार मानले गेले आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून मराठवाड्यातील रस्तेविकासाला अशोकराव गती दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशी खात्री वाटते.

मराठवाड्याला रोहयोची फार गरज 
पैठणचे शिवसेनेचे आमदार हे पहिल्यांदाच मंत्री बनले, तेही कॅबिनेट! हे खाते मलईदार मुळीच म्हणता येणार नाही; पण काम करायला खूप संधी असलेले हे खाते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात हेच खाते शिवसेनेच्या कोट्यातून बीडचे जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्याकडे होते. 
रोजगार हमी योजनेबद्दल महाराष्ट्र राज्याची मोठी ख्याती आहे. देशपातळीवर ही योजना राबवली गेली. मराठवाड्यासारख्या दुष्काळसदृश विभागात रोहयोचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे ओळखून काम मिळावे म्हणून निघणारे मोर्चे थांबवता आले तरी नूतन रोहयोमंत्री संदीपान भुमरे यांचे ते मोठे यश मानता येईल. स्वत: भुमरे हे ग्रामीण भागाचेच प्रतिनिधित्व करीत आलेले आहेत. स्लिप बॉय म्हणून त्यांनी साखर कारखान्यात काम केलेले आहे. त्यामुळे कामाचे, मेहनतीचे महत्त्व त्यांना नक्कीच कळलेले आहे.

विलासरावांच्या दूरदृष्टीची गरज
लातूरचे अमित देशमुख हे तरुण आहेत. विलासराव देशमुख यांचा मोठा वारसा त्यांना मिळालेला आहे. काँग्रेसच्या कोट्यातून ते राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री बनलेले आहेत. विलासराव देशमुखांकडे ही दूरदृष्टी आणि सौंदर्यदृष्टी होती, असे म्हणतात. याच दूरदृष्टी व सौंदर्यदृष्टीने काम करण्याची चांगली संधी अमितरावांना मिळालेली आहे. विशेषत: मराठवाड्यात व एकूणच राज्यात सांस्कृतिक चळवळीला उभारी देणारे ठोस निर्णय त्यांच्याकडून अपेक्षित आहेत.

टोपे यांच्याकडे आरोग्य 
राजेश टोपे हे मराठवाड्यातील एक महत्त्वाचे नाव. मंत्रीपदाचा  अनुभव असलेल्या राजेश टोपे यांना आरोग्य खाते दिले आहे. आरोग्याच्या रोज नवनव्या समस्या निर्माण होण्याचे आव्हान पेलवत टोपे हे आपल्या कामाचा ठसा उमटवतील, अशी अपेक्षा आहे. 

राज्यमंत्र्यांकडे महत्वाची खाती 
सिल्लोडचे अब्दुल सत्तार व उदगीरचे संजय बनसोडे हे दोघे या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत. अब्दुल सत्तार राज्यमंत्रीपदावर खुश नाहीत; पण महसूल आणि ग्रामविकाससारखी महत्त्वाची खाती त्यांना मिळालेली आहेत.  संजय बनसोडे हे नवखे आहेत. पर्यावरण, पाणीपुरवठा यासारखी खाती त्यांना मिळालेली आहेत. गाजावाजा झालेल्या  वॉटरग्रीड प्रकल्पाचा मराठवाड्याला खरोखरच काही लाभ होतो का, याबद्दल उत्सुकता आहे.

आता खऱ्या अर्थाने न्याय द्या 
राष्ट्रवादीच्या कोट्यातून बीडचे धनंजय मुंडे हे सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री बनलेले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून मागील पाच वर्षे मुंडे यांनी विधान परिषदेत जी बाजू मांडली, मग ती सामाजिक अन्याय- अत्याचाराच्या विरोधातली, भ्रष्टाचाराच्या विरोधातली किंवा विकासातल्या अनुशेषासंबंधीची असो, त्याचा चांगला अनुभव घेऊन ते कामाला लागतील आणि सामाजिक न्याय खात्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास वाटतो.

Web Title: Five ministers, accounts are good for sharing of Marathwada, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.