पाच महिन्यांमध्ये ६६ चोऱ्या, तीन दरोडे
By Admin | Published: June 16, 2014 12:29 AM2014-06-16T00:29:28+5:302014-06-16T01:17:17+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़
उस्मानाबाद : जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या उस्मानाबाद शहरासह शहर ठाण्याच्या हद्दीतील पाच गावात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे़ तीन दरोड्यांसह ६६ ठिकाणी घरफोडी, जबरी चोरी, इतर चोऱ्या झाल्या आहेत़ त्यामुळे चोरट्यांच्या मुस्क्या अवळण्यासह शहरासह ठाण्याच्या हद्दीत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे मोठे आव्हान पोनि अविनाश रायकर यांच्यासमोर असून, अपुऱ्या कर्मचाऱ्यांवर शहर ठाण्याचा कारभार हाकताना त्यांची कसोटी लागणार असल्याचे दिसत आहे़
उस्मानाबाद शहरासह पाच गावातील जवळपास दीड लाख लोकांच्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी शहर पोलिस ठाण्यात एका पोलिस निरीक्षकांसह एक सहाय्यक पोलिस निरीक्षक, एक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक व ६५ कर्मचारी कार्यरत आहेत़ यात दैनंदिन रजा व दांड्या मारणाऱ्यांची संख्या जवळपास १० आहे़ तर तीन ठाणे अंमलदार, तीन वायरलेस, तीन मदतनीस, चार लॉकअप गार्ड, दोन चालक, वॉरंट, समन्स बजावण्यासाठी आठ, बारनिशी, गोपनिय आदी कामासाठी पाच, दवाखान्यासाठी एक, बसस्थानकात दोन, तुळजापूर मंदिर सुरक्षेसाठी दोन, न्यायालयाच्या कामासाठी एक उजळणीसाठी दोन, वरिष्ठ कार्यालयाशी संलग्न पाच आदी विविध कामकाज आणि नेमणुकीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या ५२ ते ५५ आहे़ त्यामुळे ठाण्यात केवळ दहा कर्मचारी राहतात़ लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी शांततेत गेली असली तरी विधानपरिषदेसाठी रान पेटले आहे़ शिवाय सोशल मीडियावर रोज कोणाच्या न कोणाच्या छायाचित्राचे विटंबन होण्याचा प्रकार सुरू आहे़ त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित राहत आहे़ शिवाय ठाण्याच्या हद्दीत जानेवार ते मे महिन्यात घडलेल्या गुन्ह्यांची संख्याही
मोठी आहे़ यात तीन दरोडे, पाच जबरी चोऱ्या, २० घरफोड्या, ४१ चोऱ्या घडल्या आहेत़ तर दोन गटात झालेल्या दहा हाणामारीच्या घटनेत अनेकजण गंभीर जखमी झाले़ तर इतर सहा ठिकाणीही तुंबळ हाणामारी झाली आहे़ एकूणच वाढत्या चोऱ्यांच्या घटनांना आळा घालण्यासह कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर ठाण्यातील अधिकाऱ्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)
वाहनांचीही चोरी
ठाण्याच्या हद्दीत पाच महिन्याच्या काळात झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये तब्बल २० दुचाकीसह एक चारचाकी चोरट्यांनी लंपास केली आहे़ सहा खूनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याची नोंदही पोलिसांच्या डायरीत आहे़
कर्मचारी
वाढीची गरज
गत काही वर्षापासून उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी असल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांना कामाचा गाढा ओढावा लागत आहे़ त्यामुळे ठाण्यांतर्गत कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनीही ठाण्यांतर्गत अधिकारी, कर्मचारी वाढविण्याची गरज आहे़