टी-२० क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या पाचजणांना पकडले
By राम शिनगारे | Published: November 10, 2022 08:53 PM2022-11-10T20:53:55+5:302022-11-10T20:54:16+5:30
सिटीचौक पोलिसांची कारवाई : नागपूरसह शहरातील बुकी पसार, दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकातील उपांत्य फेरीतील पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यावर ऑनलाईन सट्टा खेळविणाऱ्या आणि लिंक पाठविणाऱ्या पाचजणांना सिटीचौक पोलीस ठाण्याच्या पथकाने पकडले. पाचजणांसह दोन बुकींच्या विरोधात सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविल्याची माहिती निरीक्षक अशोक भंडारे यांनी दिली.
पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांना सिटीचौक ठाण्याच्या हद्दीत क्रोम जेन्टस पार्लर, राजाबाजार येथे क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार डॉ. गुप्ता यांनी सिटौचौक ठाण्याचे सहायक निरीक्षक सय्यद मोहसीन यांना कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार निरीक्षक अशोक भंडारे, सपोनि. सय्यद, उपनिरीक्षक राेहित गांगुर्डे, कल्याण चाबुकस्वार यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधित ठिकाणी छापा मारला. तेव्हा शोएब खान साजेद खान (रा. नवाबपुरा), रितेश परशुराम सदगुरे (रा. राजाबाजार, मोंढा रोड) हे ‘https://oneplusexch.com/’ या लिंकवर ऑलनाइन बेटिंग खेळताना आढळले तसेच त्यानी ‘Oneplusexch TRUSTED MOST’ या ॲपमध्ये युजर नेम व पासवर्ड टाकून खेळवत असल्याचेही स्पष्ट झाले. या दोघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संतोष भाऊलाल बसय्यै (रा. गल्ली क्रमांक १, भानुदासनगर) हा सुद्धा लिंकवरून ऑनलाइन सट्टा खेळताना आढळला. अभिषेक सुनील अग्रवाल (रा. राजाबाजार, ह.मु. ऑगस्ट होम, उल्कानगरी) याने सट्टा खेळण्यासाठी लिंक आणि फोन पेद्वारे पैसे पाठविले. त्याचबरोबर लिंक घेऊन ग्राहकांना पैसे देत असताना आढळला. शेख मंजूर शेख मसूद (रा. रेंगटीपुरा, जुनामोंढा) हा सुद्धा क्रोम या ॲप्लिकेशनवर सर्च करून ‘https://super100.net/’ या लिंकच्या मदतीने सट्टा खेळत होता. त्याने ‘super100’ या ॲपमध्ये युजर नेम व पासवर्ड टाकून लॉग-इन केल्याचेही पोलिसांना आढळले.
पोलिसांनी पकडलेले पाच आरोपी हे सुरेश ऊर्फ संजूभाऊ रामनिवास जाजू (रा. घर क्रमांक ९०८, इतवारी, नागपूर) आणि पूरब जैस्वाल (रा. औरंगाबाद) या दोन बुकींसाठी काम करीत होते. या सर्वांचे आणखी काही बुकी असल्याचेही आरोपींच्या चौकशीत समोर आले. उपनिरीक्षक गांगुर्डे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पकडलेले पाच आणि दोन बुकींच्या विरोधात गुन्हा नोंदवला. अधिक तपास उपनिरीक्षक चाबुकस्वार करीत आहेत.