मराठवाड्यातील ८७२ प्रकल्प ५० टक्केही भरले नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 06:01 PM2019-10-14T18:01:57+5:302019-10-14T18:05:45+5:30
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७२ प्रकल्पांत यंदाच्या पावसाळ्यात ५० टक्केही पाणीसाठा झालेला नाही. ७ आॅक्टोबर रोजी पावसाळा संपण्याची तारीख आहे. परतीचा पाऊस अजूनही मराठवाड्यातील काही भागांत बरसत असला तरी बीड, लातूर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद या चार जिल्ह्यांत ६२१ टँकरने १२ लाख ५२ हजार नागरिकांना पाणीपुरवठा सुरू आहे.
मराठवाड्यात पावसाची वार्षिक सरासरी ७७९ मि.मी. इतकी आहे. ५८८.१५ मि.मी. इतका पाऊस आजवर झाला आहे. ७५.५० टक्के पाऊस विभागात झाला आहे. २५ टक्के पावसाची आजवर तूट आहे. विभागातील एकूण सर्व ८७२ प्रकल्पांत ८१९३.९२ दशलक्ष घनमीटर एवढी पाणी साठवण क्षमता आहे. त्यापैकी सद्य:स्थितीत ३६९३.२० दलघमी पाणी प्रकल्पांत आहे. ४५.०८ टक्के इतके ते पाणी आहे. चार जिल्ह्यांतील टँकरचा आकडा पाहता येणाऱ्या उन्हाळ्यात त्या जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यात सर्वाधिक ४१३ टँकर सुरू आहेत. लातूरमध्ये ३७, तर उस्मानाबादमध्ये १३७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. औरंगाबादमध्ये ३४ टँकर सुरू आहेत. १३२६ विहिरी अजूनही अधिग्रहित आहेत. आॅक्टोबर महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात टँकर सुरू ठेवण्याची परिस्थिती विभागात निर्माण झालेली आहे. खरीप हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे.
मराठवाड्यातील विविध प्रकल्पांतील साठा
प्रकल्प संख्या एकूण क्षमता सद्य:स्थितीत साठा टक्केवारी
मोठे प्रकल्प ११ ५१४३ दलघमी २८७३ दलघमी ५५.८६ %
मध्यम प्रकल्प ७५ ९४०.३४ २१५.६९५ २२.९४ %
लघु प्रकल्प ७४९ १७१२.८७ ३६४.५६ २१.२८%
गोदावरी बंधारे १३ ३२४.७७४ २३७.२९० ७३.६१ %
तेरणा व बंधारे २४ ७२.२३० २.६५३ ३.६७६ %
एकूण ८७२ ८१९३.९२ ३६९३.२० ४५.०८ %