दुचाकीस्वारांना लुटून पसार पाच दरोडेखोर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:11 AM2017-08-04T01:11:34+5:302017-08-04T01:11:34+5:30
खुलताबादला जाणाºया दुचाकीस्वार तरुणांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल आणि पाकीट हिसकावून कारने पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना सतर्क पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : खुलताबादला जाणाºया दुचाकीस्वार तरुणांना रस्त्यात अडवून बेदम मारहाण करून त्यांच्याकडील मोबाइल आणि पाकीट हिसकावून कारने पसार झालेल्या पाच दरोडेखोरांना सतर्क पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली. ही घटना दौलताबाद घाटात बुधवारी रात्री दीड वाजेच्या सुमारास घडली.
अरबाज खान अजहर खान (२१, रा. कबाडीपुरा), नवीद सिद्दीकी अजीम सिद्दीकी (२०, रा. जुना बारुदगरनाला), सय्यद सरफोद्दीन (२१, रा. जुनाबाजार),सोहेल खान फेरोज खान (२२, रा. गांधीनगर) आणि शेख शाहरुख शेख हनीफ (२४, रा. मुर्गीनाला), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी सांगितले की, खुलताबादचे रहिवासी रवींद्र सुरेंद्र फुलारे (२५) हे शेंद्रा एमआयडीसीमधील कंपनीत नोकरी करतात. बुधवारी रात्री १ वाजेच्या सुमारास ते महावीर चौकात कंपनीच्या गाडीतून उतरले. त्यांचा मित्र विशाल देवीदास सोमवंशी (२६) सोबत होता. दोघे मोटारसायकलने औरंगाबादकडून खुलताबादकडे निघाले. रात्री दीड वाजेच्या सुमारास दौलताबाद घाटातील वळणावर रस्त्याच्या कडेला पांढºया रंगाची बोनेट उघडी असलेली कार (क्रमांक एमएच-२० एच-९९७) उभी दिसली. कारजवळ उभे असलेले चार ते पाच जण अचानक रस्त्यावर आल्याचे पाहून रवींद्र यांनी घाबरून गाडीचा वेग कमी करून ती पुन्हा मागे वळविण्याचा प्रयत्न केला; परंतु उभ्या असलेल्यांपैकी दोघांनी पाठलाग करून मागे बसलेल्या विशालला कॉलर पकडून खाली पाडले. त्यांनी त्याला मारहाण सुरू केली. गाडी थांबवून रवींद्र त्याच्या मदतीला धावला. आरोपींनी त्यालाही मारहाण करीत मोबाइल आणि पाकीट हिसकावले. पाकिटात हजार रुपये होते. खुलताबादकडून अन्य दुचाकीचालक आल्याचे पाहून आरोपींनी त्यांना सोडले आणि ते कारमध्ये बसून औरंगाबादच्या दिशेने निघाले. तेथून जाणाºया अन्य वाहनांच्या प्रकाशात कारचा क्रमांक दोघांनी पाहिला. काही वेळातच तेथून दौलताबाद ठाण्याच्या पोलिसांचे गस्ती वाहन जात होते. त्यांना थांबवून झालेल्या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वायरलेसमार्फत पोलीस नियंत्रण कक्षाला दरोडेखोरांच्या गाडीची माहिती दिली.