पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 13:35 IST2025-03-11T13:35:06+5:302025-03-11T13:35:50+5:30

स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर हवेत उडून चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला मोठे भगदाड पडले.

Five shops caught fire, gas cylinder explodes; Devlaikar's heart skips a beat | पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

पाच दुकानांना भीषण आग त्यातच गॅस सिलिंडरचा स्फोट; देवळाईकरांच्या काळजाचा ठोका चुकला

छत्रपती संभाजीनगर : पाच दुकानांना लागलेली भीषण आग व त्यातच गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे सोमवारी सायंकाळी देवळाईकर हादरून गेले. सर्व दुकाने, दुचाकी व सायकल जळून खाक झाली. यात एका दुकानातील सिलिंडरच्या स्फोटामुळे दोन इमारतींना तडे जाऊन सर्व काचा फुटल्या. हा स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर हवेत उडून चौथ्या मजल्यावरील फ्लॅटला मोठे भगदाड पडले. स्फोटाचा आवाज व धुराच्या लोटांमुळे मात्र देवळाईकर सायंकाळी दोन तास भयभीत झाले होते.

अशोक हिवाळे यांचे देवळाईच्या मुख्य रस्त्यावरील मनजित प्राइडसमोर पाच गाळे आहेत. यात प्रामुख्याने दूध डेअरी, चपला व फळ विक्री, फॅब्रिकेशन, गादीघर आणि पिठाची गिरणी आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजता गादीघरात शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आत कापूस, गाद्या असल्याने आग क्षणार्धात वाढून जवळील चारही दुकानांना वेढा पडला. स्थानिकांनी धाव घेत पाण्याचा मारा सुरू केला. घटनेची माहिती कळताच अग्निशमन अधिकारी दीपराज गंगावणे, हरिभाऊ घुगे, मुश्ताक तडवी, विनायक कदम यांनी धाव घेतली.

स्फोट होताच काळजाचा ठोका चुकला
जवान आग शमवत असतानाच फॅब्रिकेशन दुकानदाराने मागे ठेवलेल्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडर गॅसने भरलेले होते. हा स्फोट इतका भयंकर होता की, सिलिंडर उंच हवेत उडाले. आसपासच्या दोन ते तीन अपार्टमेंटच्या काचा फुटल्या. एका नव्या अपार्टमेंटच्या पीयुपी, भिंतीला तडे गेले. गॅस सिलिंडर वाहून नेणारी तीनचाकी गाडी, एक स्पाेर्ट्स दुचाकी जळून खाक झाली. दोन्ही बाजूंनी वाहने थांबवली गेली.

दाहकता : शिवाजीनगरपर्यंत आवाज, भिंतीला भगदाड
गॅस सिलिंडरसह एअर कंप्रेसरही फुटले. स्फोटाचा आवाज शिवाजीनगरपर्यंत ऐकू आला. दुकानाजवळील तिरुमला रॉयल अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावरील सुहास संत यांच्या फ्लॅटला अक्षरश: छिद्र पडले. यावेळी संत यांचे कुटुंब घरातच विरुद्ध दिशेला उभे होते. सिलिंडर आदळून छिद्र पडल्याचा अंदाज आहे.

अंदाजे ६० लाखांपेक्षा अधिक नुकसान
पाच दुकानांपैकी मालक अशोक हिवाळे स्वत: डेअरी चालवत होते. त्यांचे अंदाजे १० लाखांचे नुकसान.
-अलीम शेख यांच्या चपलांच्या दुकानाचे ८ लाखांचे नुकसान.
-खालिद शेख यांचे गादी घर. ४ लाखांचे नुकसान.
-बाबासाहेब नराळे यांचे फॅब्रिकेशन दुकान. २ लाखांचे नुकसान.
-स्वाती काळे यांची पिठाची गिरणी. - ३ लाखांचे नुकसान.

फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी
गादीघरातून आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कोणालाही इजा नाही. घटनेचे नेमके कारण समजण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून तपासणी केली जाईल.
- संग्राम ताठे, पोलिस निरीक्षक, सातारा पोलिस ठाणे.

Web Title: Five shops caught fire, gas cylinder explodes; Devlaikar's heart skips a beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.