चार हजार गावांसाठी पाच हजार कोटींचा प्रकल्प
By Admin | Published: September 18, 2016 01:53 AM2016-09-18T01:53:38+5:302016-09-18T01:57:00+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली.
औरंगाबाद : जागतिक बँकेच्या साह्याने मराठवाड्यातील ४ हजार गावांच्या विकासाचा पाच हजार कोटींचा प्रकल्प राबविण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात केली. दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या ‘वॉटर ग्रीड’साठी लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.
मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने सिद्धार्थ उद्यानातील मुक्तिसंग्राम स्तंभाला पुष्पचक्र अर्पण, हुताम्यांना श्रद्धांजली आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, पालकमंत्री रामदास कदम, जिल्ह्यातील आमदार, खासदार, अधिकारी आणि स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.....................
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा मराठवाड्याच्या विकासाचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, जागतिक बँकेच्या साह्याने चार हजार गावांमध्ये शेती, पाणी, कृषी उत्पादन आणि विपणन यावर आधारित प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा देशाच्या इतिहासातील पहिलाच प्रयोग असणार आहे. यातून मराठवाड्याच्या विकासाला चालना मिळेल. मागील वर्षी भीषण दुष्काळातही जलयुक्त शिवाराची कामे चांगल्या पद्धतीने झाल्याने अकराशे गावे दुष्काळमुक्त झाली आहेत. यंदाही पाचशे गावे दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प आहे, असे ते म्हणाले. मराठवाड्यासाठी वॉटर ग्रीड तयार करण्याचे काम सुरू आहे. त्याचा आराखडा तयार होत आहे. या प्रकल्पाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात येईल. मराठवाड्याच्या हक्काचे पाणी मिळण्याची कृती सुरू झाली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. मुक्तिसंग्राम हुतात्मा स्तंभाला मुख्यमंत्री, हरिभाऊ बागडे, रामदास कदम, महापौर त्र्यंबक तुपे, जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम महाजन आदींनी पुष्पचक्र वाहिले. यावेळी पोलिसांकडून बंदुकांच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिकांची आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला खा.चंद्रकांत खैरे, खा. रावसाहेब दानवे, आ. अब्दुल सत्तार, आ. संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. नारायण कुचे, आ. अतुल सावे, वक्फ बोर्डाचे चेअरमन एम. एम. शेख, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील, पोलीस आयुक्त अमितेशकुमार, जिल्हाधिकारी निधी पांडे, महापालिका आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड, पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी आदींसह शहरातील विविध पक्ष संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
समृद्धी कॉरिडॉरमधून विकास
आगामी काळात मराठवाड्यातील सर्व जिल्हे सहा तासांच्या अंतराने मुंबईशी जोडणारा समृद्धी कॉरिडॉर प्रकल्प राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल जेएनपीटी बंदरात सहा तासांच्या आत पोहोचला पाहिजे, असा शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारा हा मार्ग असणार आहे. कृषी क्षेत्रासाठी शीतगृहांची साखळी तयार करण्याचे कामही करण्यात येणार आहे, असे फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.