औरंगाबादमध्ये पाच ट्रक फटाक्यांची होणार धडाडधूम; चारच ठिकाणी असणार 'फटाका मार्केट'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 02:10 PM2020-11-05T14:10:50+5:302020-11-05T14:16:19+5:30

ग्राहक फटाके कमी खरेदी करतील, मोठ्या प्रमाणात फटाके शिल्लक राहतील, या भीतीने दरवर्षीपेक्षा निम्म्या विक्रेत्यांनी यंदा दुकान न थाटण्याच्या निर्णय घेतला.

Five truckloads of firecrackers to explode in Aurangabad; Sales allowed in all four locations | औरंगाबादमध्ये पाच ट्रक फटाक्यांची होणार धडाडधूम; चारच ठिकाणी असणार 'फटाका मार्केट'

औरंगाबादमध्ये पाच ट्रक फटाक्यांची होणार धडाडधूम; चारच ठिकाणी असणार 'फटाका मार्केट'

googlenewsNext
ठळक मुद्देशिवकाशीहून फटाके घेऊन निघाले ३ ट्रक जळगाव-नगरहून २ ट्रक

औरंगाबाद : शहरात ठराविक मैदानांमध्ये फटाके विक्रीला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे शिवकाशीहून फटाक्यांनी भरलेले ३ ट्रक औरंगाबादकडे निघाले आहेत. याशिवाय नगर, जळगाव, खामगाव येथून २ ट्रक फटाके आणले जात आहेत. यंदा दिवाळीत शहरात ५ ट्रक फटाक्यांची धडाडधूम होणार आहे. दरम्यान, शहरात एकाच ठिकाणी मार्केट भरविण्यापेक्षा वेगवेगळ्या भागांत फटाका विक्री करण्याची मुभा महापालिकेने दिली आहे.

फटाके खरेदीसाठी  ग्राहक येतील की नाही, अशी संभ्रमावस्था विक्रेत्यांमध्ये आहे. ऐन तोंडावर राजस्थान सरकारने फटाके विक्री न करण्याचा निर्णय घेतला. यामुळे महाराष्ट्र सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते; पण स्थानिक प्रशासनाने फटाके विक्रेत्यांना विक्रीची परवानगी दिली आणि व्यावसायिकांचा जीव भांड्यात पडला. ग्राहक फटाके कमी खरेदी करतील, मोठ्या प्रमाणात फटाके शिल्लक राहतील, या भीतीने दरवर्षीपेक्षा निम्म्या विक्रेत्यांनी यंदा दुकान न थाटण्याच्या निर्णय घेतला. ज्या विक्रेत्यांनी दुकान लावण्याचे धाडस केले, त्यांनी कमी प्रमाणात फटाके मागविले आहेत. दरवर्षी बाजारात १२ ते १५ ट्रक फटाके येत असत. मात्र, जिल्हा परिषद मैदानावर फटाक्यांच्या बाजाराला आग लागल्यानंतर  फटाक्यांची मागणी कमालीची घटली आहे. त्यात कोरोनामुळे विक्रेत्यांमध्ये संभ्रम आहे. यामुळे फक्त ५ ट्रक फटाके मागविले आहेत, अशी माहिती गोपाळ कुलकर्णी यांनी  दिली. 

शहरात चारच ठिकाणी फटाका मार्केट
कोरोनाचा प्रादुर्भाव अजून पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे दिवाळीत भरविण्यात येणाऱ्या फटाका मार्केटसंदर्भात प्रशासनाने सावधगिरीचे पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी जिल्हा परिषद मैदानावर सर्वांत मोठे फटाका मार्केट भरविण्यात येत होते. चार वर्षांपूर्वी फटाका मार्केटला लागलेल्या आगीमुळे कायमस्वरूपी येथे मार्केट भरविण्यास बंदी घालण्यात आली आहे. शहरात एकाच ठिकाणी मार्केट भरविण्यापेक्षा वेगवेगळ्या भागांत फटाका विक्री करण्याची मुभा महापालिकेने दिली आहे. चार वर्षांपासून रेल्वेस्टेशन रोडवर अयोध्या मैदान येथे सर्वांत मोठे मार्केट भरविण्यात येत आहे. फटाका विक्रेते दरवर्षी चातकाप्रमाणे दिवाळीची वाट बघत असतात. अवघ्या एक आठवड्यात कोट्यवधी रुपयांच्या फटाक्यांची विक्री होते. छावणी परिषदेने अयोध्या मैदानासाठी फटाका विक्रेता असोसिएशनला अद्याप पत्र दिलेले नाही. त्यामुळे येथे किती दिवस मार्केट भरविण्यात येईल, हे निश्चित झाले नसल्याचे अग्निशमन अधिकारी सुरे यांनी सांगितले. कलाग्राम येथे ९ नोव्हेंबरपासून मार्केट सुरू होईल. टीव्ही सेंटर येथे १२ नोव्हेंबर, बीड बायपास येथे हे सात दिवस परवानगी दिली आहे. याशिवाय वाळूज, पंढरपूर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी परवानगी दिल्याचे त्यांनी नमूद केले.

महिनाभर आधी परवानगी द्यावी
फटाके विक्रेत्यांना दिवाळीच्या तोंडावर फटाके विक्रीची परवानगी दिली जाते. यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने घाईघाईत उपाययोजना करावी लागते.  प्रशासनाने दिवाळीच्या महिनाभर आधी फटाके विक्रीला परवानगी दिली, तर फटाक्यांचा दुकानाचे व ग्राहकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने नियोजन करून दुकाने लावता येतील. 
-दत्ता खामगावकर, होलसेलर्स

Web Title: Five truckloads of firecrackers to explode in Aurangabad; Sales allowed in all four locations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.