दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2022 02:16 PM2022-03-05T14:16:40+5:302022-03-05T14:22:32+5:30

पंढरपुरात मद्याने भरलेला उभा ट्रक उतारावरून सरकत-सरकत पुढे गेल्याने या ट्रकखाली सापडून पाच दुचाकींचा चुराडा झाला.

Five two-wheelers smashed as liquor loaded truck skidded off the ramp | दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा

दारूच्या ट्रकलाच चढते झिंग, उतारावरून घरंगळत गेल्याने पाच दुचाकींचा चुराडा

googlenewsNext

वाळूज महानगर : रस्त्याच्या कडेला उभा असलेला मद्याने भरलेला ट्रक उतारावरून पुढे सरकल्याने रस्त्यालगत उभ्या असलेल्या पाच दुचाकींचा ट्रकखाली सापडून चुराडा झाला. हा अपघात शुक्रवारी रात्री ९.१५ वाजेच्यासुमारास पंढरपुरात घडला असून, या अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. अपघातामुळे नगर रोडवर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती.

वाळूज एमआयडीसीतील पाल्स या मद्याचे उत्पादन करणाऱ्या कंपनीतून शुक्रवारी सायंकाळी चालक नवीदखान जावेदखान (वय ३२, रा. गारखेडा परिसर) यांनी मद्याचे बॉक्स ट्रकमध्ये (एमएच २६, ए.डी.१४९१) भरले व ते चंद्रपूरला पोहोच करण्यासाठी निघाले होते. उद्योगनगरीतून कामगार चौकमार्गे शहराकडे जात असताना रात्री ९.१५ वाजेच्यासुमारास चालक नवीदखान यांनी एटीएममधून पैसे काढण्यासाठी पंढरपुरातील जामा मस्जिद समोरील रस्त्याच्या कडेला ट्रक उभा केला. यानंतर ते एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. दरम्यान, हा ट्रक उतारावरून अचानक सरकत-सरकत पुढे गेल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दुचाकी ट्रकखाली सापडल्या. ट्रक पुढे चालल्याने नागरिकांनी आरडा-ओरड केला तेव्हा एटीएममधून परत आलेल्या चालक नवीदखान यांनी प्रसंगावधान राखत ट्रकमध्ये जाऊन ट्रक जागेवर थांबविला.

सुदैवाने जीवितहानी टळली
पंढरपुरातील व्यावसायिक व खरेदीसाठी दुकानात गेलेल्या ग्राहकांनी आपल्या दुचाकी रस्त्याच्या कडेला उभ्या केल्या होत्या. रात्री अचानक उतारावरून ट्रक पुढे सरकल्याने त्यापैकी ५ दुचाकी या ट्रकखाली सापडून त्यांचा चुराडा झाला. सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने तसेच दुचाकीजवळ कुणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत आनंद पेडणेकर यांची दुचाकी क्रमांक (एमएच०२, डीवाय ५६३८) तसेच दुचाकी (एमएच २०, बीएफ ३३३४), दुचाकी (क्रमांक एमएच २०, सीके ३५७०), स्कूटी (एमएच२०, सीके ३५७०) व एक नवीन विनाक्रमांकाची दुचाकी अशा ५ दुचाकींचा चुराडा झाला आहे. या अपघातानंतर पंढरपुरात काही काळ वाहतुकीची कोंडी होऊन दूरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

Web Title: Five two-wheelers smashed as liquor loaded truck skidded off the ramp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.