फुलंब्रीकर नाट्यगृहाचे रुपडे पालटणार!
By Admin | Published: January 30, 2017 12:00 AM2017-01-30T00:00:33+5:302017-01-30T00:04:49+5:30
जालना :आठवडभरात मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल
जालना : चांगल्या दर्जाचे नाट्यगृह नसल्याने साहित्यिक व सांस्कृतिक चळवळ थंडावली आहे. ही उणिव दूर करण्यासाठी आगामी आठवडभरात मा. फुलंब्रीकर नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी उर्मी प्रतिष्ठाच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी दिली.
उर्मी प्रतिष्ठाणच्या वतीने नूतन नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांचा रविवारी सत्कार करण्यात आला. यावेळी शहरातील थंडावलेली साहित्यिक व सांस्कृतिक गतिमान करण्यासाठी पालिकेतर्फे योगदान मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. त्यावर मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृहाला आलेली अवकळा दूर करण्यासाठी तातडीने प्रयत्न केले जातील, असे नगराध्यक्षा गोरंट्याल यांनी सांगितले.
कुठल्याही भागातील समाजाची प्रगल्भता ही त्या त्या भागातील साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीतून अधोरेखित होत असते. तसेच साहित्य व सांस्कृतिक भरणा पोषणातून मानवी जीवन अधिक समृद्ध होत असते. मानवी जिवनात कलेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मानवी विकासात याचे अमूल्य योगदान ठरते. मानवी अभिरुची जपणे आणि ते अधिक वृद्धिंगत व्हावी यासाठी समाजाने पुढाकार घेणे गरजेचे असते. पण गेल्या काही दिवसांपासून शहरातील साहित्यिक आणि सांस्कृतिक या दोन्ही चळवळी थंडावल्या होत्या.
यासाठी पुढाकार घेत उर्मी प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रा. जयराम खेडेकर, सचिव संजय कायंदे, प्रा. डॉ. नारायण बोराडे, राजाराम जाधव, कविता नरवडे, प्रा. गौतम जगताप, सीए गोविंदप्रसाद मुंदडा, प्रा. दिनेश सन्याशी यांनी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांना नाट्यगृहाचे नूतनीकरणाचे साकडे घातले. यावर सकारात्मकता दर्शवत तातडीने कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.