चोरी करून मालकाचीच बुलेट घेऊन फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 12:41 PM2020-10-10T12:41:02+5:302020-10-10T12:41:24+5:30
बुलेट, ५ मोबाईल व रोख १० हजार रूपये असा जवळपास ९५ हजारांचा ऐवज लांबवून वेटरनेच हॉटेल चालकाला गंडा घालण्याची घटना एमआयडीसी वाळूज महानगर येथे शुक्रवारी उघडकीस आली.
वाळूज महानगर : बुलेट, ५ मोबाईल व रोख १० हजार रूपये असा जवळपास ९५ हजारांचा ऐवज लांबवून वेटरनेच हॉटेल चालकाला गंडा घालण्याची घटना एमआयडीसी वाळूज महानगर येथे शुक्रवारी उघडकीस आली. वेटरविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिल आंबादास कदम (रा. बजाजनगर) याचे पंढरपूरातील धरम काट्याजवळ सारा वैभव बार अॅण्ड रेस्टॉरंट नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये कदम यांनी दि.१ ऑक्टोबर रोजी वैभव दिलीप बागुल (२२ रा. दादर, मुंबई) यास वेटर म्हणून कामावर घेतले. कदम यांनी सर्व वेटर्सची राहण्याची व्यवस्था हॉटेलमध्येच केलेली होती.
बुधवारी (दि. ७) रात्री हॉटेल बंद करुन व्यवस्थापक एकनाथ पवार घरी गेले तर कदम यांचा पुतण्या वैभव कदम हा हॉटेलमध्येच मुक्कामाला थांबला. सकाळी ४.४५ वाजेच्या सुमारास हॉटेलमधील वेटर अक्षय परागणे हा लघुशंकेसाठी उठला असता त्यास हॉटेलच्या किचनचा दरवाजा उघडा दिसला. रुममधील कुणीतरी वेटर बाहेर गेला असेल, असे समजुन अक्षय याने हॉटेलच्या बाहेर येऊन पाहणी केली असता त्यास हॉटेल मालक कदम यांची बुलेट दिसली नाही. यानंतर अक्षयने वेटर झोपलेल्या रुममध्ये जाऊन पाहिले असता चौघांचेही मोबाईल दिसले नाही. तसेच वैभव बागुल हा देखील गायब असल्याचे दिसले. यानंतर वैभव कदम याने हॉटेलचे काऊंटर तपासले असता हॉटेलमधील एक मोबाईल, रोख १० हजार रुपये, दोन एटीम कार्ड, पॅन व आधारकार्डही गायब असल्याचे दिसले.
यानंतर हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तपासणी केली असता पहाटे ३ ते ४.१५ च्या सुमारास बागुल हा काऊंटरमधुन साहित्य बाहेर काढतांना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे निदर्शनास आले. चोरी करून तो हॉटेल मालक कदम यांची बुलेट (क्रमांक एम.एच.२०, डी.ए.०३०१) घेऊन फरार झाला. याप्रकरणी हॉटेल मालक कदम यांच्या तक्रारीनुसार फरार वेटरच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक विजय घेरडे पुढील तपास करत आहेत.