तपासणीसाठीची भरारी पथके वाऱ्यावर
By Admin | Published: July 16, 2017 12:21 AM2017-07-16T00:21:08+5:302017-07-16T00:21:44+5:30
जालना : आरोग्य, शिक्षण, पशुवैद्यकीय, महसूल विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने काम करतात का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने भरारी पथकांची नियुक्ती केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : आरोग्य, शिक्षण, पशुवैद्यकीय, महसूल विभागाचे कर्मचारी स्थानिक पातळीवर योग्य पद्धतीने काम करतात का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेने भरारी पथकांची नियुक्ती केली. मात्र, दोन महिन्यांत भरारी पथकांनी एकही कारवाई न केल्याच्या मुद्यावर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्यांनी विभाग प्रमुखांना धारेवर धरले.
कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात शनिवारी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा घेण्यात आली. सभेस उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती सुमन घुगे, जिजाबाई कळंबे, रघुनाथ तौर, दत्ता बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश इंगळे, लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण यांच्यासह स्थायी समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
सभेच्या सुरुवातीला अध्यक्ष खोतकर यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून आयत्या वेळच्या विषयांवर बोलण्यास संधी दिली. सदस्य जयमंगल जाधव यांनी विविध विभागांचा पाच कोटींहून अधिक निधी अखर्चित असल्याचे निदर्शनास आणून देत यास जबाबदार शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन विभागांच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची मागणी अध्यक्षांकडे केली. यावर मंजूर पूर्ण निधी खर्च होईल यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना खोतकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. जाफराबाद व भोकरदन तालुक्यात साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक साधने उपलब्ध नाहीत. आरोग्य केंद्र पंधरा-पंधरा दिवस बंद असतात, अधिकारी व कर्मचारी जागेवर नसतात. जाफराबाद व डोणगाव केंद्रात रॅबीज व सर्पदंशाची लस उपलब्ध नाही यास जबाबदार कोण, असा सवाल शालिग्राम म्हस्के यांनी केला. उपाध्यक्ष टोपे यांनी आरोग्य अधिकारी अमोल गिते यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले. आरोग्य केंद्रांच्या तपासणीसाठी नियुक्त भरारी पथकांनी केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला. मात्र, वाहन नसल्यामुळे पथकांना कारवाईस जाता आले नसल्याचे गिते यांनी स्पष्ट केले. यावर खोतकर यांनी आक्षेप घेतला.
अवधूत खडके यांनी जामखेड येथील आरोग्य केंद्राच्या मुद्यावरून आरोग्य अधिकाऱ्यांना धारेवर धरले. लोणारभायगाव, माहेरभायेगाव, साडेसावंगी गावांमधील खराब रस्ते दुरुस्तीचे कामे सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. बप्पासाहेब गोल्डे यांनी यांत्रिक विभागाने खरेदी केलेल्या सौर पंपाचा मुद्दा उपस्थित केला. यांत्रिक विभागाने शासन योजनेनुसार एक एचपीचा सौरपंप चार लाख ६९ हजारांना तर पाच एचपीचे काही पंप पाच लाख ४० हजारांना कसे खरेदी केले, याची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच मठजळगाव येथे रोजगार हमीच्या कामात मृताच्या नावावर पैसे काढण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणी केली. जिल्ह्यात किती रुग्णांना एचआयव्हीसारखे आजार आहेत याची नोंद आरोग्य विभागाकडे आहेत, का असा सवाल आशा पांडे यांनी विचारला. आरोग्य अधिकाऱ्यांनी याबाबत दिलेल्या उत्तरावर पांडे यांच्यासह अध्यक्ष खोतकर यांचे समाधान झाले नाही.