छत्रपती संभाजीनगरातून ठरावीक शहरांनाच ‘उड्डाण’; सेवावाढीसाठी प्रयत्नांच्या ‘राजकीय’ गप्पाच

By संतोष हिरेमठ | Published: April 5, 2023 02:22 PM2023-04-05T14:22:39+5:302023-04-05T14:29:16+5:30

नुकसान तर होणारच, ५ वर्षांत ४ कंपन्यांची विमानसेवा बंद

'Flight' from Chhatrapati Sambhajinagar to certain cities only; 'Political' talk of efforts to increase services | छत्रपती संभाजीनगरातून ठरावीक शहरांनाच ‘उड्डाण’; सेवावाढीसाठी प्रयत्नांच्या ‘राजकीय’ गप्पाच

छत्रपती संभाजीनगरातून ठरावीक शहरांनाच ‘उड्डाण’; सेवावाढीसाठी प्रयत्नांच्या ‘राजकीय’ गप्पाच

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : जगाच्या नकाशावर पर्यटननगरी, उद्योगनगरी, ऐतिहासिक शहर म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. मात्र, याच शहराच्या विमानसेवेला ‘घरघर’ लागली आहे. गेल्या पाच वर्षांत तब्बल चार विमान कंपन्यांची विमानसेवा बंद पडली. ठरावीक तीन-चार शहरांसाठीच विमानांचे ‘उड्डाण’ होत आहे. नव्या विमानसेवा वाढीच्या नुसत्या गप्पा होतात. प्रत्यक्षात हवाई कनेक्टिव्हिटी वाढत नसल्याने शहराचे सर्व बाजूंनी नुकसान होत आहे.

छत्रपती संभाजीनगरहून सध्या एअर इंडिया आणि इंडिगो या दोन कंपन्यांचीच विमानसेवा सुरू आहे. त्यांच्या माध्यमातून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू आहे. यामध्ये बंगळुरू विमानसेवा गत आठवड्यातच सुरू झाली. चिंताजनक म्हणजे आजघडीला शहरातून सायंकाळी मुंबईला जाण्यासाठी एकही विमान नाही. नवीन विमानसेवा करणे सोडा; पण मुंबईची सायंकाळची विमानसेवा कायम ठेवण्यातही लोकप्रतिनिधींना अपयश आले. कोरोनापूर्वी २०१९ मध्ये शहरातून एअर इंडिया, स्पाइस जेट, ट्रुजेट, इंडिगोच्या माध्यमातून मुंबई, दिल्ली, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, उदयपूर विमानसेवेने चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळाची धावपट्टी दिवसभर व्यस्त राहत असे; परंतु सध्या केवळ दोनच कंपन्यांची विमानसेवा उरली आहे.

आधी १४-१६, आता ६-७ विमाने
इंडिगोने सुरू केलेल्या बंगळुरू विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सरासरी ११० ते १२० प्रवासी या विमानसेवेचा लाभ घेत आहेत. कोरोनापूर्वी दिवसाला शहरातून १४ ते १६ विमान सुरू असायची, तीच आता ६ ते ७ आहेत. शहरातून अहमदाबाद, गोवा, इंदूर, जयपूर विमानसेवा गरजेची आहे, असे एअर कनेक्टिव्हिटी एव्हिएशन ग्रुपचे सदस्य अक्षय चाबूकस्वार म्हणाले.

अशी आली विमानसेवा जमिनीवर
शहरात सुरू असलेली जेट एअरवेटची विमानसेवा मार्च २०१९ मध्ये बंद पडली; तर त्यापूर्वी २०१५ मध्ये स्पाईस जेटची विमानसेवा बंद पडली होती; पण स्पाईस जेटने २०१९ मध्ये पुन्हा एकदा शहरातून विमानसेवा सुरू केली. ट्रु जेट कंपनीकडून हैदराबाद आणि अहमदाबादसाठी विमानसेवा सुरू होती; तर दिल्ली, मुंबईपाठोपाठ एअर इंडियाने तब्बल २१ वर्षांनंतर उदयपूरसाठी विमानसेवा सुरू केली. कोरोनाच्या विळख्याने स्पाईस जेट, ट्रुजेटची विमानसेवा बंद पडली; तर एअर इंडियाची उदयपूर विमानसेवाही ‘जमिनी’वर आली. २०२२ मध्ये फ्लायबिग एअरलाइन्सची विमानसेवा तर दोनच महिन्यांत बंद पडली.

Web Title: 'Flight' from Chhatrapati Sambhajinagar to certain cities only; 'Political' talk of efforts to increase services

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.