औरंगाबादपेक्षा शिर्डीला प्राधान्य, शहरातून सेवा बंद केलेल्या विमानाचे शिर्डीतून ‘उड्डाण’
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 02:14 PM2022-09-05T14:14:46+5:302022-09-05T14:16:00+5:30
औरंगाबादला नव्या विमानसेवेची प्रतीक्षाच
औरंगाबाद : कोरोनाच्या विळख्यात औरंगाबादहून सुरू असलेली स्पाइस जेट, ट्रुजेटची विमाने बंद झाली. औरंगाबादची बंगळुरू, अहमदाबादची हवाई कनेक्टिव्हिटी तुटली. औरंगाबादहून विमानसेवा बंद केलेल्या स्पाइस जेटचे शिर्डीतून मात्र उड्डाण सुरू आहे. त्यामुळे विमान कंपन्या औरंगाबादपेक्षा शिर्डीला प्राधान्य देत असल्याचे पुन्हा दिसत आहे.
औरंगाबादला सध्या दिल्ली, मुंबई आणि हैदराबादला एअर इंडिया, इंडिगो आणि प्लाय बिगच्या माध्यमातून हवाई कनेक्टिव्हिटी आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर नव्या विमान सेवेचे १ जूनला ‘टेक ऑफ’ झाले. या दिवसापासून फ्लायबिग एअरलाईन्सच्या सकाळच्या वेळेतील हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद विमानसेवेला सुरुवात झाली. मात्र, विमान चेकिंगसाठी गेल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात ही विमानसेवाही रद्द करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०१९ पासून स्पाइस जेटने औरंगाबादहून विमानसेवा सुरू केली होती. कोरोनापूर्वी स्पाइस जेट आणि इंडिगोकडून बंगळुरूसाठी विमानसेवा दिली जात होती.
अहमदाबादसाठीही विमानसेवा सुरू झाली. मात्र, कोरोनाचा औरंगाबादच्या विमानसेवेला मोठा फटका बसला. स्पाइस जेट, ट्रुजेटची विमानसेवा बंद झाली. अहमदाबाद, बंगळुरूची विमानसेवा ठप्प झाली. आता या दोन्ही शहरांसाठी विमानसेवेची प्रतीक्षाच करावी लागत आहे. औरंगाबादहून सेवा बंद केलेल्या स्पाइस जेटची शिर्डी-चेन्नई, शिर्डी- बंगळुरू, शिर्डी-हैदराबाद विमानसेवा सुरू असल्याचे पर्यटन, वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.
नव्या विमानसेवेसाठी पाठपुरावा
औरंगाबादहून पुणे आणि बंगळुरूसाठी विमानसेवा सुरू होण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. अहमदाबाद विमानसेवेसाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल, असे औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या सिव्हिल एव्हिएशन कमिटीचे अध्यक्ष सुनीत कोठारी म्हणाले.