मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 05:07 PM2018-03-13T17:07:32+5:302018-03-13T17:12:09+5:30

औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

Flood of letter of remembrance For the Maratha Reservation from the seven districts of Marathwada | मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

मराठा आरक्षणासाठी  मराठवाड्यातील सात जिल्ह्यातून निवेदनांचा ‘महापूर’

googlenewsNext
ठळक मुद्देराज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली.यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे.

- राम शिनगारे 

औरंगाबाद : राज्य मागासवर्ग आयोगातर्फे मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील प्रत्येक तालुक्यातील दोन गावांमध्ये सर्वेक्षण केल्यानंतर जिल्हावार जनसुनावणी घेतली. यामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी निवेदनांचा पाऊस पाडला आहे. औरंगाबाद वगळता उर्वरित सात जिल्ह्यांमध्ये तब्बल २ लाख ३६ हजार ४७९ निवेदने प्राप्त झाल्याची माहिती आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे यांनी दिली.

राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात योग्य शिफारशी करण्याची विनंती राज्य मागासवर्ग आयोगाला केली आहे. यासाठी राज्य सरकारने आयोगाकडे उच्च न्यायालयात दाखल केलेले शपथपत्रासह सर्व अहवाल अभ्यासासाठी दिले. मात्र, आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण ठरविण्यासाठी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आयोगाचे सदस्य डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांच्या नेतृत्वात मराठवाड्यात सर्वेक्षण करण्यात आले. 

या सर्वेक्षणानंतर आयोगातर्फे जिल्हास्तरावर खुली जनसुनावणी घेण्यात आली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येच अध्यक्ष न्यायमूर्ती एम.जी. गायकवाड उपस्थित होते, तर उर्वरित ठिकाणी डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. राजेश करपे आणि रोहिदास जाधव यांनीच संस्था, संघटना, पक्ष, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांकडून निवेदने स्वीकारली. यात पहिल्या टप्प्यात लातूर व उस्मानाबाद येथे जनसुनावणी घेण्यात आली. पहिल्या टप्प्यात अनेक लोकांपर्यंत माहिती पोहोचली नसल्यामुळे आयोगाने दुसºया टप्प्यातील नांदेड, हिंगोली, परभणी, बीड आणि जालना येथे योग्य ती काळजी घेत जनसुनावणीची माहिती जनतेपर्यंत पोहोचविली. यामुळे नागरिकांनी पुराव्यांसह आयोगाकडे लाखावर निवेदने दिली. या निवेदनांचे आयोग वर्गीकरण करणार आहे. या वर्गीकरणानंतर याविषयीचा सविस्तर अहवाल तयार करण्यात येईल, असे डॉ. करपे यांनी सांगितले.


१६ मार्चला औरंगाबादेत जनसुनावणी
मराठवाड्यातील सात जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेतल्यानंतर विभागस्तरावरील जनसुनावणी शुक्रवारी (दि.१६) सुभेदारी विश्रामगृह येथे सकाळी ११ ते ४ या वेळेत आयोजित केली आहे. या जनसुनावणीला अध्यक्ष न्यायमूर्ती गायकवाड, तज्ज्ञ सदस्य डॉ. सर्जेराव निमसे यांच्यासह आयोगाचे सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासह मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी, संस्था, संघटना आणि नागरिकांना लेखी निवेदने सादर करीत यात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. राजेश करपे यांनी केले.

जिल्हा              निवेदने
लातूर               ४९०
उस्मानाबाद     ९८९
नांदेड               ९०,०००
हिंगोली            ३९,०००
परभणी            ४७,०००
बीड                  ३१,०००
जालना             २८,०००
एकूण               २,३६,४७९

Web Title: Flood of letter of remembrance For the Maratha Reservation from the seven districts of Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.