महापालिकेच्या वार्ड आरक्षण सोडतीवर येणार आक्षेपांचा महापूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 04:21 PM2020-02-05T16:21:22+5:302020-02-05T16:31:18+5:30
अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
औरंगाबाद : महापालिकेने सोमवारी वॉर्ड आरक्षणासाठी सोडत घेतली. याचवेळी ११५ वॉर्डांची नवीन रचना जाहीर केली. अत्यंत मनमानी पद्धतीने वॉर्ड फोडण्यात आल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मोजक्याच राजकीय मंडळींचे हित जोपासण्यासाठी हा सर्व खटाटोप केल्याचा आरोप उघडपणे होत आहे. मनपा प्रशासनाने वॉर्ड रचना, सोडतीवर आक्षेप स्वीकारण्यास सुरुवात केली. पहिल्याच दिवशी सहा आक्षेप दाखल झाले.
महापालिकेच्या निवडणूक विभागाकडे ११ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप स्वीकारले जाणार आहेत. पुढील सात दिवसांमध्ये निवडणूक विभागाकडे आक्षेपांचा महापूर येणार आहे. या सर्व आक्षेपांवर राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी सुनावणी घेणार आहेत. महापालिकेने प्रकाशित केलेले नकाशे आणि प्रत्यक्षात वॉर्डाची चतु:सीमा यात बराच फरक पडत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. भौगोलिक रचनेचा कुठेही विचार करण्यात आलेला नाही. संजयनगर सी या भागात एकाच अंतर्गत रोडवर तीन वॉर्डांचा समावेश केल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करीत आहेत. संजयनगर हा जुना वॉर्डच गायब करण्यात आला आहे. या वॉर्डाचे मतदार तीन इतर वॉर्डांमध्ये टाकण्यात आले आहेत.
रस्ता ओलांडून वॉर्ड तोडू नये असे निकष निवडणूक आयोगानेच ठरवून दिलेले आहेत. या सर्व निकषांची पायमल्ली वॉर्ड रचनेत झाली आहे. त्याचप्रमाणे वॉर्ड आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदविण्यात येत आहेत. सोमवारी पहिल्याच दिवशी मनपाच्या निवडणूक विभागाकडे ६ आक्षेप प्राप्त झाले. याशिवाय आक्षेप, हरकती नोंदविण्यासाठी अनेकांनी या विभागात भेट देऊन चौकशी केली. आक्षेप आणि हरकती नोंदविण्याची अंतिम मुदत ११ फेब्रुवारी आहे. या मुदतीत शेकडो आक्षेप, हरकती दाखल होण्याची शक्यता आहे.